सत्यपाल यांचा राजीनामा मंजूर

मुंबई – मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. सिंह यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यावर अवघ्या २४ तासांच्या आतच मंजूरीची मोहोर उठवण्यात आली. त्यामुळे सिंह यांच्यासाठी ‘खाकी’ वर्दी जाऊन ‘खादी’चा प्रवास सुरू झाला आहे.

दरम्यान, सिंह यांच्या राजीनाम्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. सत्यपाल सिंह हे १९८०च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सिंह यांनी राजीनामा देतानाच आपल्यासमोर अनेक पर्याय खुले असल्याचे सांगितले होते. आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची आपली इच्छा आहे. त्याअनुशंगाने काही पक्षांची मला ऑफरही आहे. त्याचवेळी विदेशातूनही मला बोलावणं आहे, असे सिंह म्हणाले होते. त्यामुळे आता प्रत्यक्ष राजीनामा मंजूर झाल्यानंतर सिंह यांचे पुढचे पाऊल कोणते असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिंह यांच्या आज दिवसभरातील प्रतिक्रिया पाहता त्यांचा भाजपकडे जास्त ओढा असल्याचे दिसत आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची ‘सच्चा राष्ट्रवादी’ अशा शब्दांत स्तुती करून त्यांनी त्यादिशेने पहिले पाऊलही टाकले आहे. शिवाय आधीची पार्श्वभूमीही तसे स्पष्ट संकेत देत आहे.