शरद पवार यांनी नरेंद्र मोदीची भेट घेतल्याची चर्चा

नवी दिल्ली, – आगामी काळात होत असलेले लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन आठवड्यांपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकांची समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणूकीपूर्वी पवारांनी मोदींची भेट घेऊन सुमारे अर्धा तास चर्चा केली. मात्र या भेटीचा सुगावा राष्ट्रवादी किंवा भाजपच्या नेत्यांनाही लागला नाही, असेही या वृत्तात म्हटले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात दंगलीवरून मोदींवर केलेल्या टीकेवर दंगलीप्रकरणी न्यायलायाने मोदींना क्लीनी चीट दिली असून, इतरांनीही त्यांना सोडाला हवे, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिला होता. त्यामागोमागच आलेल्या या भेटीच्या वृत्ताने राष्ट्रवादीच्या पुढच्या वाटचालीची दिशाच जणू दाखवून दिली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसशी युती करण्याच्या निर्णयावर पवार ठाम असले तरीही ते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काम करण्यास तयार नाहीत. मात्र राहुल गांधी यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे काँग्रेस नेत्यांचे मत आहे. त्यातच सध्या देशात मोदींची लाट असल्याने, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाबाबत पवारांना शंका असल्याचे दिसत आहे. पवार-मोदींच्या या गुप्त भेटीमागे हेच प्रमुख कारण असल्याचे कळत आहे. शरद पवारांनी मात्र या गुप्त भेटीचे वृत्त फेटाळले आहे.