सुप्रिया सुळेंनी केली आशा मिरगे यांची पाठराखण

मुंबई – महिलांवर होत असलेल्या बलात्कारांबाबत वादग्रस्त विधान करणार्‍या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. आशा मिरगे यांची पाठराखण करण्यास खासदार सुप्रिया सुळे सरसावल्या आहेत. त्यांच्या बचाव करताना सुळे म्हणाल्या की घरातील मोठ्या बायका तरुणींना समज यावी म्हणून जे बोलतात तेच आशाताई बोलल्या आहेत. तो आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. आशाताई यांनी माहिलांसाठी खूप काम केले आहेच पण पिडीत महिलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की झाल्या प्रकाराबाबत आशाताईंनी माफी मागितली आहे त्यामुळे हे प्रकरण आता बंद केले पाहिजे.

नागपूरमध्ये पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना डॉ. मिरगे यांनी मुलींची देहबोली तसेच त्या घालत असलेले कपडे यामुळेच पुरूषांचे लक्ष वेधले जाते आणि बलात्काराच्या घटना घडतात असे वक्तव्य करतानाच दिल्लीत निर्भयाला अपरात्री सिनेमाला जाण्याची गरजच काय होती असाही सवाल केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टिका झालीच पण राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावून एक आठवड्याच्या आत नोटिसीचे उत्तर देण्यास सांगितले आहे.