मोदी निर्दोष : पटेलांना पटले

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टाईम्स् नाऊ ला दिलेली मुलाखत त्यांना काय भाव पडणार आहे यावर आता बरीच चर्चा होत आहे. ही मुलाखत झाली त्या दिवशी कॉंग्रेसच्या नेत्यांनी कपाळावर हात मारून घेतला आणि नंतरच्या दोन दिवसात ही मुलाखत राहुल गांधी यांना फार महागात पडणार असे स्पष्ट संकेत मिळायला लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेसची गुजरात दंगल आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधीची बदलती भूमिका हा राहुल गांधी यांच्या मुलाखतीचाच परिणाम आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत आपली भूमिका बदलून जे सत्य सांगितले आहे ते मोदीविरोधकांना पचणारे नाही. म्हणून ते सत्य कथन प्रकट झाल्यापासून कॉंग्रेस पक्षासह सारे मोदीविरोधक थयथयाट करायला लागले आहेत. परंतु प्रफुल्ल पटेल यांनी काही फार क्रांतीकारक विधान केलेले नाही. एखाद्या माणसाला गुन्हेगार ठरवताना त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला आहे की नाही हे पहावे. सिद्ध झाला नसल्यास त्याला गुन्हेगार म्हणता येणार नाही. न्यायालयीन प्रक्रियेत तो गुन्हेगार नसल्याचे दिसून आले असेल तरी सुद्धा त्याला गुन्हेगार म्हणणे हा त्या माणसावरचा अन्याय आहे आणि न्यायालयाचा अवमान आहे.

हा सारा न्याय मोेदी यांना लागू केला जावा आणि त्यांना दंगेखोर म्हणू नये, असे प्रफुल्ल पटेल यांचे म्हणणे आहे. आता या म्हणण्यात चूक काय आहे? पण आजवर मोदीविरोधकांनी त्यांच्या विरोधात दंगेखोर दंगेखोर म्हणून जी राळ उडवली होती ती तशी उडविण्याची सोय आता राहणार नाही. म्हणून त्यांचा थयथयाट सुरू झाला आहे. प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांचे निकटवर्ती आहेत. ते कधीही अवाजवी विधाने करत नाहीत, तोलून मापून बोलतात. त्यामुळेच शरद पवार यांनी आपल्यासारख्याच संयमित असलेल्या प्रफुल्ल पटेल यांना पक्षातर्फे बोलण्याची परवानगी दिलेली आहे. म्हणजे प्रफुल्ल पटेल जे बोलतात ते पवारांचे मत असते असे समजायला काही हरकत नाही. आजपर्यंत तरी कधी प्रफुल्ल पटेल यांनी गैरवाजवी विधान करून पक्षाला अडचणीत आणलेले नाही. त्यांनी काल नरेंद्र मोदी यांच्या संबंधात सूचक विधान केले आणि त्याचे पडसाद राजकारणात उमटत राहिले. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या नव्या भूमिकेमुळे या पक्षाचा कल बदलला असल्याचे सूचित होत आहे.

नरेंद्र मोदी यांचे विरोधक त्यांना दंगलखोर ठरवत असतात आणि सातत्याने तसा प्रचार करून मुस्लीम मते आपलीशी करण्याची धडपड करत असतात. वास्तविक २००२ च्या गुजरात दंगलीमध्ये नरेंद्र मोदी यांचा हात असल्याचा कसलाही पुरावा पुढे आलेला नाही आणि कोणत्याही न्यायालयात तसे सिद्ध झालेले नाही. असे असूनही काही समाजवादी, साम्यवादी आणि कॉंग्रेसवाले नरेंद्र मोदींचा उल्लेख दंगलखोर असाच करत असतात. खरे म्हणजे हा नरेंद्र मोदी यांच्यावर अन्याय आहे. न्यायालयात नरेंद्र मोदी दंगलखोर ठरले तर त्यांना तसे म्हणण्यास काही हरकत नाही. परंतु २००२ सालची दंगल होऊन अकरा वर्षे उलटली तरी एकाही न्यायालयात मोदींवर ठपका ठेवावा असे काही सिद्ध झालेले नाही. या काळामध्ये केंद्रातली सत्ता कॉंग्रेसच्याच हातात होती आणि सीबीआय ही यंत्रणाही त्यांच्याच हातात होती. नरेंद्र मोदी दंगलखोर असतील तर कॉंग्रेस सरकारच्या हाती असलेल्या या तपास यंत्रणांचा वापर करून मोदींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावता आला असता आणि ते दंगेखोर आहेत हे सिद्ध करता आले असते.

किंबहुना एका माजी खासदाराच्या पत्नीला कॉंग्रेसचेच नेते फूस लावत असून सदर महिला मोदींच्या विरोधात सातत्याने न्यायालयीन लढा देत आहे. झाकिया जाफरी नावाच्या या महिलेने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिलेला आहे. परंतु गुजरात दंगलीमागे मोदींचा हात असल्याचे कोणत्याही स्तरावर सिद्ध झालेले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी हीच गोष्ट नमूद केली आहे. जर नरेंद्र मोदी यांना न्यायालये दंगेखोर ठरवत नसतील तर त्यांना आपण दंगेखोर म्हणता कामा नये. न्यायालयाच्या निर्णयाचा आपण आदर केला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते गेल्या दहा वर्षांपासून हेच सांगत आले आहेत. मोदींचा दंगलीत हात नाही हे न्यायालयाच्या निकालाच्या अनुरोधाने ते सांगत आहेत. परंतु मोदींना बदनाम करून भारतीय जनता पार्टीला मुस्लीम समाजाचे खलनायक ठरविण्याचा विडा उचललेल्या मोदीविरोधकांना ही गोष्ट पटत नाही. किंबहुना पटत असूनही त्यांचे हितसंबंध मुस्लीम मतांत गुंतले असल्यामुळे मोदींना न्याय द्यायला ते तयार नाहीत.

असे असले तरी प्रफुल्ल पटेल यांनी मात्र या मोदीविरोधकांच्या दुष्ट प्रचाराला जबरदस्त तडाखा दिला आहे. आता तरी मोदींवर अन्याय करणार्‍या या अंध मोदीभक्तांना मोदींवर दंगेखोरीचा आरोप करताना विचार करावा लागेल किंवा विचार न करताही त्यांना मोदीविरोधाचे व्रत पाळायचेच असेल तर निदान त्यांच्या मनाला आपण सरसकट खोटे बोलत आहोत ही टोचणी तरी लागेल आणि एवढ्यावरही त्यांनी निर्लज्जपणा करायचे ठरवलेच असेल तर त्यांच्या मोदीविरोधाचा जनतेवर कसलाही परिणाम होणार नाही. प्रफुल्ल पटेल यांना जे पटले आहे ते लोकांना मागेच पटले आहे, पण आता पटेल यांच्या तोंडून शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना न्याय दिला आहे. लोकांनी तो मागेच दिलेला आहे, त्यामुळे पटेल आणि पवार यांनी तो देणे अपरिहार्यच होते.

Leave a Comment