मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु कृष्णकुमार यांचे निधन

नाशिक – येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आर. कृष्णकुमार (वय 52) यांचे आज पहाटे चारला नागपूरमधील शिवगंगा क्रिटीकेअर रुग्णालयात आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई, बहीण, आई असा परिवार आहे. डॉ. आर. कृष्णकुमार यांच्या निधनाने निरंतर शिक्षणाचा ज्ञानदीप मालवला आहे, अशा शद्बांमध्ये शिक्षण क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. कृष्णकुमार यांनी 4 मार्च 2010 ला मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे स्विकारली होती.

पदार्थविज्ञान या विषयात त्यांनी डॉक्‍टरेट मिळवली होती. यापूर्वी ते नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राचार्यपद भूषविले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास परिषदेचे ते संचालक होते. याशिवाय केरळ आणि बिहारच्या राज्यपालांचे विशेष सचिवपदी ते कार्यरत होते. देशातील 450 विद्यापीठांची संघटना असलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

“नॅक’ समितीचेही ते सदस्य होते. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 14 संशोधन शोधनिबंध प्रकाशित केले होते. आंतरराष्ट्रीयस्तरावरील 10, राष्ट्रीयस्तरावरील 21 आणि राज्यस्तरावरील 39 परिषदांमध्ये ते सहभागी झाले होते. आदर्श शिक्षक, महर्षी वाल्मिकी राष्ट्रीय, बिहार शिक्षण, बिहार गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.