मुख्यमंत्र्यांचेच आंदोलन

आम आदमी पार्टीचे दिल्लीतले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केन्द्र सरकारने तीन पोलीस अधिकार्‍यांना रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपले धरणे आंदोलन संपवले. भारताच्या इतिहासात एखाद्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनी धरणे धरल्याचा हा पहिलाच प्रसंग असेल. तो पहिला प्रकार तर आहेच पण तो इतका उथळपणाचा आहे की तो शेवटचाच प्रकार ठरावा अशीच इच्छा कोणीही व्यक्त करील. आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी आणखी एक विक्रम केला आहे. तो म्हणजे वेश्यांच्या अड्डयावर स्वत: मंत्र्यांनीच धाड टाकली आहे. केवळ धाडच टाकली आहे असे नाही तर अधिकार नसताना धाड टाकली आहे. या पक्षाचे आणि त्याच्या कारभाराचे भारताच्या राजकारणावर नेमके काय परिणाम होणार हा आज चर्चेचा विषय झालेला असतानाच या पक्षाचे मुख्यमंत्री आणि अन्य मंत्रीही चक्क स्टंटबाजी करायला लागले आहेत. या पक्षाचा भारताच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होईल हे सांगता येत नाही पण ते दावा करतात तशी भारतातली राजकीय शैली बदलण्यासाठी आवश्यक तेवढी प्रतिभा त्यांच्याकडे नाही. असे दिसायला लागले आहे.

अजूनही काही लोकांना आशा वाटते पण जोपर्यंत या पक्षाच्या कामाचे स्वरूप पूर्णपणे लोकांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत यावर फार टिप्पणी करता येत नाही. प्रत्यक्षात या पक्षाचे कामकाज म्हणून ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या सगळ्या अती उत्साहीपणाच्या सदरात मोडाव्यात अशाच ठरत आहेत. दिल्ली हे राज्य असले तरी या शहरातली कायदा सुव्यवस्था हा राज्य सरकारचा विषय नसून तो केंद्र सरकारच्या गृह खात्याच्या हातात आहे. परिणामी कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात या सरकारला काहीच करता येत नाही आणि त्याबाबतीत कसली आश्‍वासने देणे, काही वल्गना करणे याही गोष्टी त्यांच्यासाठी अनुचित ठरतात. मात्र याचे भान नसलेल्या आप सरकारच्या काही मंत्र्यांनी भलत्याच उत्साहामध्ये काम करून संकट ओढवून घेतले आहे आणि केंद्र विरुद्ध राज्य असा बखेडा उभा करून ठेवला आहे. असा संघर्ष एकवेळ मान्य करता आला असता. दिल्लीतले सरकार आम आदमी पार्टीचे आणि केंद्रातले सरकार कॉंग्रेसचे आहे. परंतु दिल्लीतले आम आदमीचे सरकार कॉंग्रेसच्या पाठींब्यावर उभे आहे आणि या पाठींब्याशिवाय हे सरकार टिकून राहणार नाही. अशावेळी कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात त्यांनी केंद्र सरकारच्या विरुद्ध काही तरी करणे हे राजकीयदृष्या सुद्धा चुकीचे आहे.

परंतु या सरकारचे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी दिल्ली शहराच्या काही भागातील सेक्स रॅकेट आणि ड्रग रॅकेट उघडे करण्याकरिता स्वत:च धाव घेतली. आता अशा प्रकारे मंत्र्यांनीच वेश्यांच्या अड्ड्यावर छापे टाकणे हे कितपत उचित आहे, असा प्रश्‍न आपल्याला पडतो. पण या अतीउत्साही मंत्र्यांना भारतामध्ये आपण एक नवी राजकीय शैली विकसित करत आहोत हे दाखविण्याचा एवढा सोस आहे की, त्या सोसापायी ते अनुचित गोष्टी करायला लागले आहेत. देशाच्या कोणत्याच राजकीय पक्षाच्या सरकारचे मंत्री अशा अड्डयांवर स्वत: धाडी घालत नाहीत, पण आपण मात्र अशा धाडी घालून नवी राजकीय शैली प्रस्थापित करणार आहोत असे त्यांना दाखवायचे होते. मंत्री स्वत:च जर अड्ड्यांवर धाडी घालायला लागले तर मग पोलिसांचे काम काय? त्यातही या मंत्र्यांनी अशा धाडी घालताना औचित्य पाळलेले नाही. गुन्हेगारी विश्‍वावर कसलीही कारवाई करताना महिलांच्या बाबतीत फार संवदेनशीलता दाखवावी लागते. महिला गुन्हेगार आणि महिला आरोपी यांना वागणूक देताना अनेक नियमांचे पालन करावे लागते. पण सोमनाथ भारती यांनी उत्साहाच्या भरात या धाडीमध्ये महिलांशी नको तसे वर्तन केले. धाडी घालण्यापूर्वी समन्स हाती असावे लागते एवढी सामान्य बाबही या कायदा मंत्र्याच्या ध्यानात आली नाही.

धाडी टाकलेल्या या महिलासुद्धा आफ्रिकेतल्या होत्या. आता ते सेक्स रॅकेट आणि ड्रग रॅकेट हे प्रकार नेमके काय होते हा मुद्दा मागेच पडला आहे आणि मंत्र्यांनी महिलांना दिलेली वागणूक हाच वादाचा विषय होऊन बसला आहे. दिल्लीतले पोलीस सोमनाथ भारती यांच्या अधिकारात काम करत नाहीत. त्यामुळे त्यांनी सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध महिलांशी गैरवर्तणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पक्षाच्या एका आमदारालाही पोलिसांनी आरोपी केलेले आहे. या सगळ्या गोष्टी हास्यास्पद ठरत आहेत. नवी राजकीय शैली प्रस्थापित करण्यासाठी इतक्या सवंग गोष्टी करण्याची गरज नाही. थोडे गांभीर्याने करावयाचे हे काम आहे. त्याला वेळ लागेल, तोपर्यंत वाट पहावी लागेल, अनेक अडचणींचा पूर्वविचार करून यासाठीची पावले टाकावी लागतील या गोष्टींचे कसलेच भान या आपच्या अतिउत्साही मंत्र्यांना राहिलेले नाही. परिणामी नवी राजकीय शैली लांबच राहिली, पण या मंत्र्यांचे मात्र हसे व्हायला लागले आहे आणि राजकारणावरला आम आदमी पार्टीचा परिणाम हा विषय मागे पडायला लागला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तरी काही औचित्य पाळायला हवे होते. त्यांनी केन्द्र सरकारच्या विरोधात चक्क धरणे धरले.

Leave a Comment