विनोद घोसाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई- शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांची बदनामी केल्या प्रकरणी दहिसर येथील आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांची रुग्णालयात जाऊन जबानी घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. गेल्या काही दिवसांपासून नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा मोबाईल क्रमांक सार्वजनिक स्वच्छतागृहात लिहून बदनामी करीत असल्याची तक्रार शीतल म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी दहिसर पोलीस ठाण्यात केली होती.

काही दिवसांपूवी म्हात्रे यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कुठलीच कारवाई न करता स्वच्छतागहातील मोबाईल क्रमांक पुसून टाकण्यात आले होते. मात्र, हे प्रकरण चिघळल्याने म्हात्रे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.म्हात्रे-घोसाळकर प्रकरणावरून शिवसेनेतील वाद तापलेला असतानाच राष्ट्रीय महिला आयोगाने पोलिसांकडून या प्रकरणाचा अहवाल मागविला आहे.

दरम्यांन, पोलिसांनी बोरिवली आयसी कॉलनीतील एम.एम. रुग्णालयात जाऊन म्हात्रे यांची जबानी घेतली. विनोद घोसाळकर यांच्यावर ५०१, ५०६ आणि ५०९ या कलमांअंतर्गत अश्लीलल शब्द वापरणे, तसेच गैरवर्तन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी घोसाळकर यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.