
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतर्फे ५ कोटी कर्मचार्यांना घर बांधणीसाठी सहाय्य देण्याची योजना सरकारच्या विचाराधीन असल्याचे केंद्रीय कामगार मंत्री ऑस्कर फर्नांडीस यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतर्फे ५ कोटी कर्मचार्यांना घर बांधणीसाठी सहाय्य देण्याची योजना सरकारच्या विचाराधीन असल्याचे केंद्रीय कामगार मंत्री ऑस्कर फर्नांडीस यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना फर्नांडीस म्हणाले की कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमुळे निवृत्तीनंतर कर्मचार्याला पैसा मिळतो त्याचप्रमाणे या फंडधारकांना घरेही मिळावीत यासाठी योजना विचाराधीन आहे. फंडधारक दरमहा त्यांच्या बेसिक पगारातून १२ टक्के रक्कम निर्वाह निधीत भरत असतो. यातच आणखी १० टक्के रक्कम त्यांनी भरली तर त्यांना स्वतःचे घर मिळविणेही शक्य होणार आहे. कर्मचारी जी १० टक्के जादा रक्कम भरतील ती घरे पुरविण्यासाठी उपयोगात आणली जाईल. कर्मचारी आयुष्यभर कष्ट करतो मात्र निवृत्तीनंतर मिळालेला पैसा स्वतःचे घर घेण्यासाठी बहुतेक वेळा खर्ची पडतो. त्याऐवजी काम करत असतानाच घरासाठीची तरतूद त्यांना करता येईल.
केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे कमिशनर के.के.जालान यांनीही सरकार या योजनेवर विचार करत असल्याचे सांगितले. अन्य एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीही साहेबसिग कामगार मंत्री असतानाही कर्मचार्यांना घरे बांधून दिली गेली होती मात्र त्यावेळी कोणतेही जादा काँट्रीब्युशन घेतले गेले नव्हते. निर्वाह निधीकडे सध्या सुमारे ५ लाख कोटींचा निधी जमा असून दरवर्षी त्यात ६० हजार कोटींची भर पडत असते. त्यामुळे बडे घरबांधणी प्रकल्प हाती घेऊन ते पूर्ण करणे सहज शक्य आहे. फक्त किती कर्मचारी जादा रक्कम भरण्यास तयार होतील याचा अभ्यास केला गेला पाहिजे.