सुशीलकुमारांच्या जावयावर दावा दाखल करण्याचे आदेश

पुणे – केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे जावई राज श्रॉफ यांच्यावर बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडप केल्याप्रकरणी दावा चालविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या बालेवाडी परिसरातील ५१ गुंठे जमीन श्रॉफ यांनी अनुसुया बालवडकर यांच्याकडून पॉवर ऑफ एटर्नी करून विकासासाठी १६ फेब्रुवारी २००५ रोजी घेतली होती. मात्र ती त्यांनी विकसित केलीच नाही. दरम्यान अनुसुया यांचे २००९ साली निधन झाले आणि त्यामुळे श्रॉफ यांना दिलेली पॉवर ऑफ एटर्नीही रद्द झाली. अनुसुया यांचे वारस भगवान यांनी ही जमीन गणेश गायकवाड यांना ५ एप्रिल २०१० रोजी विकली. मात्र श्रॉफ यांनी १३ ऑगस्ट २०१० रेाजी मृत अनुसुया यांच्याकडून ती खरेदी केली असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. गायकवाड यांनी पोलिसांत तक्रार देऊनही पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही. अखेर गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेतली.

३१ मे २०११ रोजी प्रथम न्यायादंडाधिकारी देशपांडे यांनी या संदर्भात तपासाचे आदेश दिले मात्र श्रॉफ यांनी ते निर्दोष असल्याचा अहवाल न्यायालयाला सादर केला होता. गायकवाड यांनी तरीही न्यायालयात दाद मागणे सुरूच ठेवले व अखेर न्यायालयाने श्रॉफ यांच्यांवर दावा दाखल करण्याचे आदेश जारी केले आहेत.

Leave a Comment