स्नोडेन फ्रिडम ऑफ प्रेस फौंडेशनच्या संचालक पदावर

डॅनियल एल्सबर्ग सहसंस्थापक असलेल्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या फ्रिडम ऑफ प्रेस फौंडेशनच्या संचालक बोर्डावर अमेरिकेच्या गुप्त कारवायांची लक्तरे वेशीवर टांगणारा एडवर्ड स्नोडेन याची नियुक्ती करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. या फौंडेशनची स्थापना २०१० साली करण्यात आली असून निर्भय पत्रकारिता आणि पत्रकाराच्या हक्कासाठी हे फौंडेशन कार्यरत आहे.

या नियुक्तीविषयी स्नोडेन याने आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणतो, अमेरिकेने चालविलेले प्रत्येकाच्या कम्युनिकेशनवर नजर ठेवण्याचे काम व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवरचे अतिक्रमण आहे. हा प्रकार सुरू राहावा की बंद व्हावा यावर जनतेनेच म्हणणे मांडायला हवे. या फौंडेशनच्या माध्यमातून मला जी सेवेची संधी मिळते आहे त्याचा मी पूर्ण उपयोग करीन आणि एल्सबर्ग सोबत काम करण्याची संधी हा माझ्यासाठी जीवनगौरव पुरस्कार आहे.

एल्सबर्गच्या मते पत्रकारितेत कांही गैर दिसले तर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी धैर्य असावेच लागते. आम्हाला स्नोडेनसारख्या अनेकांची गरज आहे. स्नोडेनमुळे आजच्या पत्रकारितेला संरक्षण आणि उद्याच्या पत्रकारांना प्रोत्साहन मिळणार आहे. पत्रकार आणि त्यांना माहिती पुरविणारे स्त्रोत यांच्यात कुणाचीही पाळत असली तरी सुरक्षित संवाद होण्याची गरज असते आणि सुरक्षित संवाद कसा साधता येईल याचे स्नोडेन याला सखोल ज्ञान आहे. त्याचा आम्हाला निश्चितच उपयोग होणार आहे.