कच-यावर प्रक्रिया करून गॅस, वीजेची निर्मिती

पुणे- पुणे शहरात दररोज जमा होणा-या पंधराशे ते सोळाशे टन कच-यावरील प्रक्रियेवरील काम सुरू आहे. त्यात ओल्या कच-यावर प्रक्रिया करून गॅस, वीजेची निर्मितीचे काम सुरू आहे. शहरातील हॉटेलांमधून जमा होणा-या सुमारे १२५ टन ओल्या कच-यावर सध्या प्रक्रिया केली जात असून त्यापासून खत, गॅस आणि वीजही तयार होत आहे.

महापालिकेकडून पुणे शहरात ओल्या कच-यावर प्रक्रिया करून कचरा जिरवण्याचा प्रयोग शहरात मात्र यशस्वीरीतीने सुरू आहे. हॉटेलांमधून जमा होणा-या सुमारे १२५ टन ओल्या कच-यावर सध्या प्रक्रिया केली जात असून त्यापासून खत, गॅस आणि वीजही तयार होत आहे. महापालिकेतर्फे उरुळी येथील कचरा डेपो परिसरात कचरा प्रक्रिया करणारे भव्य प्रकल्प असून तेथे या प्रक्रियेचे काम हंजर, रॉथकेम आणि अन्य काही कंपन्यांना देण्यात आले आहे. मात्र, हंजर आणि रॉथकेम या कंपन्यांच्या कामाबाबत अनेक आक्षेप असून हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमेतेने चालवले जात नाहीत, हे वेळोवेळी उघड झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ओल्या कच-यावर प्रक्रिया करुन शहरातील छोटे प्रकल्प चांगल्या पद्धतीने चालवले जात आहेत. वाहतुकीसाठी येणारा हा मोठा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने ओल्या कच-यावर प्रक्रिया करणारे छोटे प्रकल्प शहरात गेल्या चार वर्षांपासून उभारले जात आहेत.

मॉडेल कॉलनी परिसरात शहरातील असा पहिला प्रकल्प सुरू झाला होता. त्या पाठोपाठ आता असे सतरा प्रकल्प शहरात सुरू आहेत. त्यांची क्षमता प्रत्येकी पाच टन ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्याची आहे. मॉडेल कॉलनी, धानोरी, तळजाई पठार, पेशवे उद्यान, बाणेर, के. के. मार्केट, आळंदी रस्ता, वडगाव बुद्रुक, कात्रज, वडगाव शेरी आदी ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात आले असून तेथे हॉटेलमधून गोळा केल्या जाणा-या कच-यावर प्रक्रिया केली जात आहे.