राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचेच आमचे ध्येय – सुशीलकुमार शिंदे

सोलापूर – येत्या 17 जानेवारीला राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपद उमेदवारीच्या घोषणेची शक्यता असताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र पीएमपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले. शरद पवार आपले राजकीय गुरू आहेत. ते पंतप्रधानपदी आरूढ झाल्यास मला आनंदच होईल, असे सुशीलकुमार शिंदे शनिवारी एका कार्यक्रमात म्हणाले.

या वक्तव्याचे राजकीय वतरुळात पडसाद उमटताच राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचेच आमचे ध्येय आहे. काँग्रेसकडून तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. ते त्या पदासाठी सक्षमही आहेत, असा खुलासा त्यांनी दिवसभर विविध कार्यक्रमांतून केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करू नये, असे मत गुरुवारी मांडले होते. दुसरीकडे, परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी घोषणा कधीही होवो, आमच्यासाठी राहुल हेच उमेदवार असल्याचे म्हटले होते. त्यापाठोपाठ शिंदे यांच्या वक्तव्याने पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्येच संभ्रमाची स्थिती उद्भवल्याची चर्चा होती.

आप काँग्रेससाठी आव्हान नाही : काँग्रेसने 128 वर्षांच्या काळात अनेक आंदोलनांचा यशस्वीपणे सामना केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी (आप) काँग्रेससाठी आव्हान नाही, असे सुशीलकुमार शिंदे यांनी तुळजापुरातील एका कार्यक्रमात सांगितले. शनिवारी दिवसभर शिंदेंच्या वक्तव्याचे पडसाद राजकीय वतरुळात उमटत होते. यामुळे त्यांनी तुळजापूर येथील मातंग समाजाचा मेळावा, सोलापुरातील विविध कार्यक्रमांतून सविस्तर खुलासा केला. माध्यमांनी माझे वक्तव्य पूर्णपणे दाखवले नाही, त्यामुळे असा गोंधळ निर्माण झाल्याचे ते म्हणाले. शरद पवार आणि त्यांच्यातील गुरू-शिष्य नात्याचाही त्यांनी वारंवार उल्लेख केला. माध्यमांनी हे वृत्त चुकीच्या पद्धतीने प्रसारित केल्याचे सांगून त्यांनी नाराजीही व्यक्त केली.