कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुर शहरात टोलचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. कोल्हापुरात टोल आंदलनाचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी टोल बंदीचे आश्वासन देऊनही, गेल्या काही दिवसांपासून टोलवसुली सुरु असल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी रविवारी फुलेवाडी व शिरोली येथील दोने टोलनाके फोडले आहेत. शिवसेनेने सोमवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारीच महापालिकेकडून ५०० कोटी आयआरबीला देऊ असे आश्वासन दिले होते. लेखी आश्वासनही देऊन, टोलवसुली रद्द करण्यात येईल, असे सांगण्यात आले. पण त्यानंतरही रविवारी टोलवसुली सुरु असल्याच्या रागातून शिवसैनिकांनी ही तोडफोड केली आहे. दुसरीकडे महापालिकेचा म्हणजेच जनतेचा पैसा आयआरबीला का, असा सवाल कोल्हापूरकरांनी विचारला. पण यावेळी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
शहरांतर्गत टोल असा उपक्रम देशात फक्त कोल्हापुरातच सुरू करण्यात येत होता. तो हाणून पाडला जात आहे. यासाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून जनआंदोलनाचा लढा उभारला जात आहे. २२० कोटी रुपयांवरुन ५२० कोटी रुपयांच्या घरात या प्रोजेक्टची किंमत लावून ३० वर्षे टोल रुपाने लुटण्याचा डाव करण्यात आला होता.