आघाडीत तू तू मै मै जारी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलण्या आणि वागण्यात संयमी समजले जातात पण काल त्यांनी नगरमध्ये एका भाषणात बोलताना आपला संयम सोडला आणि साखरेचे दर उतरण्यास शरद पवार जबाबदार असल्याचे सूचित करणारा एक सवाल खडा केला. गतवर्षी साखरेचे उत्पादन भरपूर झालेले असतानाही साखर आयात का केली असा सवाल त्यांनी जाहीरपणे विचारला. खरे म्हणजे उत्पादन जास्त असतानाही साखर आयात करणे हा शेतकर्‍यांचे खच्चीकरण करण्याचा प्रकार असतो आणि यंदा तसे झालेलेही आहे. देशात भरपूर साखर असताना साखर आयात केल्यामुळे साखरेचे दर कोसळले आहेत आणि शेतकरी अडचणीत आले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रश्‍न विचारताना, त्यामुळे शरद पवारांची प्रतिमा खराब होईल अशी कल्पना केलेली आहे आणि त्यासाठीच हा सवाल विचारलेला आहे. परंतु त्यातून केवळ पवारांची नव्हे तर चव्हाणांचीसुध्दा प्रतिमा खराब होते. कारण देशात साखर असतानाही साखर आयात केली जात होती. तेव्हा मुख्यमंत्री काय झोपले होते का असा प्रश्‍न कोणीही विचारू शकतो. किंबहुना ते झोपलेलेच होते आता मात्र शेतकर्‍यांचा कळवळा असल्याचे नाटक करून पवारांच्या डोक्यावर खापर फोडत आहेत. दोघेही शेतकर्‍यांचे शत्रूच आहेत.

असे असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री हेच केवळ शेतकर्‍यांचे शत्रू आणि राज्य सरकारच्या कारभारातील मंदगतीला जबाबदार आहेत असा आरोप करायला सुरूवात केली आहे. अजित पवार राज्य शासनाचा कारभार वेगवान नाही असे वारंवार सांगत असतात. त्यांच्या दृष्टीने सरकार म्हणजे मुख्यमंत्री. मुख्यमंत्री वेगाने काम करत नाहीत ही गोष्ट पवार काका-पुतणे गेल्या तीन वर्षापासून सातत्याने आणि जाणीवपूर्वक सांगत आले आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे कासवगतीने काम करणारे मुख्यमंत्री आहेत ही गोष्ट त्यांना जनतेच्या मनावर ठसवायची आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची ही खास नीती आहे. हा पक्ष मंत्रिमंडळात असतो, सरकारमध्ये असल्याचे फायदे उपटतो आणि निवडणुका जवळ आल्या की सरकारच्या अकार्यक्षमतेचे खापर मुख्यमंत्र्यावर फोडून नामानिराळे होण्याचा प्रयत्न करतो. हे करताना स्वतः केलेल्या काही चांगल्या गोष्टींचा गवगवाही केला जातो. मात्र जे दोष असतील ते दोष पवार काका-पुतणे विरोधी पक्षांनाही लाजवेल अशा हिरीरीने मांडत असतात. म्हणजे चार वर्षे सत्तेत आणि एक वर्ष सत्तेत राहून विरोधात असे पवारांच्या आघाडीचे नाटक असते. हा प्रकार केवळ राज्यातच चालू आहे असे नाही तर तो केंद्रातही तसाच आहे.

श्री. शरद पवार हे केंद्रात कृषी मंत्री आहेत. या मंत्रीपदाचे सगळे लाभ ते घेतात आणि त्यांनी घेतलेले आहेत. परंतु चार राज्यात कॉंग्रेसचा पराभव होताच पवारांनी कॉंग्रेसचे नेतृत्व दुबळे असल्यामुळे पराभव झाल्याचा निष्कर्ष काढला आणि पराभवाशी आपला काहीच संबंध नाही असा देखावा केला. खरे म्हणजे चार राज्यातला जनतेचा कौल हा केंद्र सरकारच्या विरोधातला कौल आहे. म्हणजे तो मनमोहन सिंग यांच्या विरोधातला जसा आहे तसा तो शरद पवारांच्या विरोधातला सुध्दा आहे. त्याच चालीवर महाराष्ट्रातही असे म्हणता येते की, महाराष्ट्राचे शासन धीम्या गतीने काम करत असेल तर त्या मंदगतीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जेवढे जबाबदार आहेत तेवढेच उपमुख्यमंत्री अजित पवारसुध्दा जबाबदार आहेत. परंतु निवडणुका जवळ येताच अजित पवारांनी आपल्या या सरकारशी काही संबंध नाही असा देखावा उभा करीत मंदगतीचे सारे अपश्रेय मुख्यमंत्र्यांना देण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी कितीही नाटक केले तरी महाराष्ट्रातल्या दुःशासनाची जबाबदारी त्यांना फार दिवस टाळता येणार नाही. किंबहुना या सरकारच्या होणार्‍या पराभवाला मुख्यमंत्र्यांपेक्षाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्रीच अधिक जबाबदार आहेत. कारण राज्याच्या मंत्रिमंडळातील गृह, पाटबंधारे, उर्जा, बांधकाम, अर्थ अशी सगळी मोक्याची खाती राष्ट्रवादीच्या हातात आहेत. असे असूनही राष्ट्रवादीचे नेते एकामागे एक ठरवून बोलल्याप्रमाणे मुख्यमंत्र्याच्या विरोधात बोलत सुटले आहेत.

या ठिकाणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थन करण्याची आमची भूमिका नाही. तेही मंदगतीचेच आहेत. परंतु या गतीचे अपश्रेय जेवढे त्यांचे आहे त्यापेक्षा जास्त राष्ट्रवादीचे आहे हेच आम्हास दाखवावयाचे आहे. या दोन पक्षामध्ये अकार्यक्षमतेची जबाबदारी परस्परावर ढकलण्याचा खेळ इतक्या हास्यास्पद पातळीला येऊन पोहोचला आहे की त्यांची हसे होत चाललेले आहे. याचा त्यांनाही पत्ता नाही. या दोन मित्र पक्षांचे नेते शत्रू असल्यागत परस्परांचे उणेदुणे काढतात. परंतु काही लोकांचे असे म्हणणे होते की हे दोन्ही पक्ष सत्तेच्या बाबतीत फारच आग्रही असल्यामुळे सत्ता मिळविण्यासाठी निदान निवडणुकीच्या तोंडावर तरी मैत्रीचे नाटक करतील. ते नाटक केल्याशिवाय सत्ता मिळत नाही हे त्यांना चांगलेच समजते. परंतु आता या दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या तोंडावर सुध्दा परस्परांचे दोष दाखवण्याचा सिलसिला अजिबात थांबविलेला नाही. कारण आजवर त्यांनी केवळ वादच घातला असा नाही. तर परस्परांच्या प्रतिमा खराब करण्याचाही प्रयत्न केला आहे आणि एकमेकांचे खच्चीकरण करण्याचे डावपेच लढवले आहेत.