मुंबई / पुणे – आम आदमी पक्ष महाराष्ट्रातील सर्व म्हणजे 48 जागा लोकसभेला लढविणार असल्याचे जाहीर केले तरी या पक्षाने शहरी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी अनेक उमेदवारांची शोधमोहिम सुरु केली असून अनेक आजी-माजी सनदी अधिकारी, चित्रपट तारे-तारका तसेच अन्य प्रतिष्ठितांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.
याचसाठी उत्तर-मध्य मुंबईतून सलग तिस-यांदा काँग्रेसच्या खासदार झालेल्या प्रिया दत्त यांच्याविरोधात प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरु आहे. याचबरोबर पुण्यातून अरुण भाटिया, नाशिकमधून विजय पांढरे, नागपूरमधून अजंली दमानिया, मुंबईतून मयांक गांधी, वाय. पी. सिंग, प्रीती मेनन-शर्मा यांच्या नावावर खल सुरु आहे. मावळ मतदारसंघातून पिंपरी-चिंचवडमधील मारूती भापकर यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे.
आपने यापूर्वीच सुनील केंद्रेंकर आणि जालनात जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेले तुकाराम मुंडे यांना निमंत्रण धाडले आहे. या दोघांना औरंगाबाद, बीड, जालनामधून तिकीटाची ऑफर होती. मात्र त्यांच्याकडून अद्याप होकार-नकार कळालेला नाही. त्यामुळे आम आदमी पक्ष आपले पक्ष संघटन मजबूत नसल्याची नस ओळखून प्रतिष्ठित व चर्चेतील चेहरे घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.