सोन्याने अंदाज खोटे पाडले

भारतीय लोकांचे वर्णन जगात नेहमीच सोन्यासाठी भुकेले लोक असे केले जाते. हौस म्हणून आणि गुंतवणूक पर्याय म्हणूनही भारतीय लोक सोने खरेदी करीत सुटतात. आपल्या जवळचा पैसा जास्तीत जास्त प्रमाणात पैशात गुंतवणे म्हणजे व्यवहारीपणा असा त्यांचा समज असतो. भारतातल्या लोकांची श्रीमंती त्याच्या घरावरून, वाहनावरून किंवा पैशावरून मोजली जात नाही. त्याच्याकडे किती पैसा आहे यावरून ती मोजली जाते. जास्त सोने बाळगण्यात खरी श्रीमंती दडलेली आहे असे भारतीय लोक समजतात. म्हणूनच भारतीयांनी मेहनत करून जे काही कमावले आहे ते पिढ्यान् पिढ्यांचे धन अधिकात अधिक प्रमाणात सोन्यात गुंतवले आहे. भारताच्या श्रीमंंतीचे ते लक्षण आहे असे मानले जाते. गेल्या वर्षी केरळातल्या एका मंदिरातले जमिनीत पुरलेले धन काढण्यात आले. ते ३०० वर्षांपासून पुरून ठेवण्यात आले होते. ते कोणीही उकरून काढायचे नाही असा दंडक होता. जो कोणी तसा प्रयत्न करील त्याचे वाटोळे होईल अशा समजुती होत्या. ते सोने शेवटी मनाचा निश्‍चय करून उकरण्यात आले तेव्हा ते किमान दहा लाख कोटी रुपयांचे असावे असा अंदाज करण्यात आला. एका मंदिरातल्या सोन्याची ही किंमत आहे. अशा रितीने भारताच्या अनेक मंदिरात असे करोडो रुपयांंचे सोने लपवून तरी ठेवण्यात आले आहे किंवा ते दागिन्याच्या स्वरूपात वापरले तरी जात आहे.

भारतात सोन्याला एक धार्मिकही महत्त्व आहे. त्याचा अधिकात अधिक साठा करणे हे मोठे पुण्याचे काम मानले जाते. आपल्या कडे असलेले सोने विकणे हे मोठेच कमीपणाचे मानले जाते. त्यामुळे लोक सोने खरेदी करतात आणि ते साठवून ठेवतात. सोने साठवून ठेवणे म्हणजे तेवढा पैसा गोठवून ठेवणे. आपली संपत्ती आपण अशी गोठवून ठेवली आहे आणि आपल्याकडे गुंतवणूक करून औद्योगिक प्रगती करायला पैसा नाही. आपल्या देशात यूरोप आणि अमेरिकेेचे लोक पैसा गुंतवतात आणि कारखाने काढून नफा कमावून श्रीमंत होतात. आपल्याकडे गुंतवायला पैसा नाही म्हणून आपण त्यांना आपल्या देशात गुंतवणूक करायला केवळ प्रोत्साहनच देतो असे नाही तर त्यांना तसा आग्रह करतो. त्यांना त्यासाठी अनेक सवलती देतो. हे सारे कशासाठी तर आपल्या कडे पैसा नाही म्हणून. खरे तर आपल्याकडे पैसा आहे पण तो आपण सोन्यात गोठवून म्हणजेच मृत करून ठेवून दिला आहे. अमेरिकेचे लोक आपल्याला अनेक अटी घालून आपल्या देशात गुंतवणूक करीत आहेत.

आपल्या देशात खाजगी सोने साठे इतके आहेत की त्या साठ्यांची किंमत अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेजवळ असलेल्या सोन्याएवढी आहे पण आपण ती संपत्ती नव्याने गुंतवून अधिक पैसा कमावण्यासाठी करीत नाही. सोन्यातली गुंतवणूक सोपी असते. ते मोडायला सोपे जाते. त्याची किंमत सतत वाढतच असते अशा काही कल्पना आपल्या मनात आहेत. त्यामुळे आपल्या देशात पैसा गुुंतवण्याचे अनेक पर्याय असतानाही आपल्या देशातले लोक शक्यतो आपला पैसा सोन्यातच गुंतवतात. हाच पैसा आपण शेअर बाजारात गुंतवला किंवा बँकांत ठेवींच्या स्वरूपात ठेवला तर काय होईल याचा विचार करा. आपल्या घरात पाच तोळे सोने असते. म्हणजे पाच तोळे सोन्याच्या रूपात आपल्या घरात दीड लाख रुपये पडून असतात. त्याचे दागिने केले तरीही आपण ते दागिने फारसे वापरत नाही. उलट ते सुरक्षित रहावेत म्हणून सेफ लॉकर्स मध्ये ठेवून देतो. त्याऐवजी आपण तो पैसा एखाद्या बँकेत ठेवला तर बँक त्यावर आपल्याला व्याज तर देईलच पण तेच पैसे एखाद्या उद्योजकाला देईल आणि तो उद्योजक त्या पैैशात उद्योग काढून त्या दीड लाखाचे तीन लाख करील. त्यातून एक दोन बेकारांना काम मिळेल आणि एकुणात समाजाची श्रीमंती वाढेल. पण हेच पैसे आपण सोन्याच्या स्वरूपात घरात ठेवून दिले तर आपल्या मनाला केवळ समाधान वाटेल पण समाजाला त्याचा काही फायदा होणार नाही.

म्हणजे सोने हे आपल्या श्रीमंतीचे काही प्रमाणात लक्षण आहे पण तेच सोने आपल्या गरिबीचे कारणही आहे. दोन तीन वर्षांखाली सोन्याचे भाव वाढत गेले आणि सोन्यातल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळायला लागला. त्यामुळे सोन्यात पैसा गुंतवण्याची एकच घाई सुरू झाली. त्यातून सोन्याची मागणी वाढली आणि मागणी वाढली म्हणून भावही वाढले. अशा रितीने काही मानसिक कारणांनी सोने महागले. अशी दरवाढ ही कृत्रिम असते. तिच्यातून उत्पादक असे काहीच घडत नाही. भाव वाढून वाढून एवढे वाढतात की एके दिवशी भाववाढीचा फुगा फुटतो. आता तसेच झाले आहे आणि सोन्याच्या भावाने एक मर्यादा गाठून आता खाली यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात ज्यांनी सोन्यात भरमसाठ गुंंतवणूक केली त्यांना आता पश्‍चात्ताप करावा लागत आहे. पण हे घडले ते बरेच झाले कारण आता सोन्यात गुंतवणूक कमी होईल आणि त्याचे भाव कमी होतील. त्यातून लोकांचा सोन्याकडचा ओढा कमी होईल. शेअर बाजार आणि बँका अशा उत्पादक मार्गांनी गुंतवणूक वाढून उत्पादनाला आणि रोजगाराला चालना मिळेल. सोन्याचे भाव असेच कोसळले पाहिजेत.

Leave a Comment