आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाही, – शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. तेव्हा शरद पवारांनी आगामी निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत यावर यापूढे चर्चा नको, असे सांगितले आहे. त्याच बरोबर यापुढे वरिष्ठांचे सभागृह अर्थात राज्यसभेत जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दिल्ली विधानसभेत सत्तेवर आलेला नवा पक्ष आणि नरेंद्र मोदी यांचा प्रभाव महाराष्ट्रात चालणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, नव्या पक्षाची चिंता करण्याची गरज नाही. भाजपचे नरेंद्र मोदी यांचाही राज्यात प्रभाव पडणार नाही. कारण, दिल्लीतही त्यांचा प्रभाव जाणावलेला नाही.

‘ कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीला निट काम करत नसल्याची खंत पवारांनी व्यक्त केली. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या वेळी ज्याप्रमाणे काम केले जाते तसे लोकसभा निवडणूकीत कार्यकर्ते काम करत नाहीत. यावेळीही असे झाले तर लोकसभेत पक्ष मागे पडेल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहेलोत यांनी चांगले काम केल्याचे पवार म्हणाले.