वॉशिंग्टन – पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धामधील बर्फाच्छादित अंटार्क्टिक भागात अडकलेल्या चिनी व रशियन जहाजांच्या मदतीसाठी अमेरिकेने आपले हिमनग फोडून मार्गक्रमणा करु शकणारे मोठे जहाज “पोलर स्टार’ (आईस कटर) पाठविले. या जहाजांवर सुमारे 120 कर्मचारी अडकले आहेत.
या जहाजांच्या आसपास चार मीटर जाडीचा बर्फ दाटला आहे. यासंदर्भात मदतकार्य करत असलेल्या ऑस्ट्रेलियन सरकारी संस्थेने मदतीचे आवाहन केल्यानंतर अमेरिकेने हे जहाज पाठविण्याचा निर्णय घोषित केला होता. अकादमिक शोकाल्स्की (रशिया) व शु लॉंग (चीन) ही दोन जहाजे येथील बर्फामध्ये अडकली आहेत. रशिया व चीननेही यासंदर्भात अमेरिकेकडे मदत मागितली आहे.
“या दोन्ही जहाजांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारच्या संकंटांमध्ये प्रथमत: जीव वाचविण्यास अमेरिकेचे प्राधान्य आहे. अकादमिक शोकाल्स्कीवरील कर्मचाऱ्यांना विमानांद्वारे बाहेर काढण्यात आले आहे, ही आनंदाची बाब आहे,” असे अमेरिकन नौदलामधील उच्चाधिकारी पॉल एफ झुकुंफ्ट यांनी सांगितले.
399 फुट लांबीचे अजस्त्र पोलर स्टार हे जहाज तीन नॉट च्या वेगाने सुमारे सहा फुटापर्यंत साठलेला बर्फ फोडत प्रवास करु शकते. महासागरांमधील साठलेल्या बर्फाचा निचरा करण्यासाठीच हे जहाज बनविण्यात आले आहे. अकादमिक शोकाल्स्कीच्या मदतीसाठी गेलेले चीनचे शु लॉंग हे जहाजही अडकून बसले. हे जहाज महासागरामधील मोकळ्या प्रवाहापासून सुमारे 21 किमी अंतरावर अडकले असून त्याच्या अवतीभोवती चार मीटर जाडीचा बर्फ दाटला आहे.