सुशीबेन शाह महिला आयोगाच्या नव्या अध्यक्ष

मुंबई – गेल्या चार वर्षांपासून राज्य महिला आयोग अध्यक्षाविनाच होतं अखेर या वर्षांच्या शेवटच्या दिवशी आयोगाला अध्यक्षा मिळाल्या आहेत. ऍड. सुशीबेन शाह या महिला आयोगाच्या नव्या अध्यक्ष असणार आहेत. तब्बल चार वर्षांनंतर महिला आयोगाला अध्यक्ष लाभल्यात. सुशीबेन शाह या सध्या मुंबई महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष आहेत. त्या स्त्रीशक्ती नावाची संघटना चालवतात.

सुशीबेन या मुरली देवरा गटाच्या मानल्या जातात. त्यांच्या नावासाठी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा आणि खासदार रजनीताई पाटील यांनी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडने शिक्कामोर्तब केलं. त्यांच्याबरोबरच सहा सदस्यांचीही घोषणा करण्यात आली. सोमवारी राज्य महिला आयोगाच्या नव्या अध्यक्ष निवडीबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली.

या बैठकीत अध्यक्षपदासाठी चार नावं चर्चेत होती. त्यामध्ये मुंबईच्या ऍड. सुशीबेन शाह यांचं नाव आघाडीवर होतं. त्यांच्याशिवाय चंद्रपूरच्या ऍड.विजया बांगडे, जळगावच्या ललिता पाटील, कोल्हापूरच्या सरला पाटील यांच्याही नावावर विचारही करण्यात आला. मात्र अखेर हायकमांडने सुशीबेन शाह यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.