अमेरिकी दूतावासांमध्ये भारतीयांना कमी पगार?

नवी दिल्ली – अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य कार्यालयांमध्ये काम करणार्‍या भारतीयांना मिळणार्‍या पगाराबाबत अमेरिका त्यांच्याच कायद्याचा भंग करत असल्याची शंका उत्पन्न होत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या दोन्ही संस्थांमध्ये आणि येथील अधिकार्‍यांच्या घरी काम करणार्‍या भारतीयांच्या पगाराबाबत माहिती मागविली असून, ती देण्यात या संस्थांकडून टाळाटाळ होत आहे.

नाताळ आणि नव्या वर्षानिमित्त असलेल्या सुट्‌ट्यांमुळे हा विलंब होत असल्याचे कारण यासाठी दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आचारी आणि वाहनचालक यासारख्या पदांवर काम करणार्‍या भारतीयांना बारा ते पंधरा हजार रुपये पगार दिला जातो. हा पगार अमेरिकेतील कमीत कमी वेतनश्रेणीच्याही बराच खाली आहे.

देवयानी खोब्रागडे अटकप्रकरणी भारत सरकारने तज्ज्ञांच्या एका विशेष गटाची स्थापना केली असून, या गटाची पहिली बैठक सोमवारी दिल्लीत होत आहे. परराष्ट्र सचिव सुजातासिंह यांनी या बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती सूत्रांनी आज दिली. या विशेष गटामध्ये कायदा, अर्थ, मनुष्यबळ व्यवस्थापन आदी विषयांशी संबंधित आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय संस्था या विषयातील तज्ज्ञही बैठकीत सहभागी होणार आहेत.

देवयानी यांना झालेली अटक आणि या प्रकरणातील सर्व घडामोडींवर बैठकीत चर्चा होणार आहे. तज्ज्ञांचा विशेष गट या प्रकरणातील रोजच्या घडामोडींचा अभ्यास करणार आहे. अमेरिकेच्या भारतातील राजनैतिक अधिकार्‍यांसाठी काम करणार्‍या भारतीय कर्मचार्‍यांना नेमका किती पगार मिळतो, याबाबतच्या माहितीचे विश्‍लेषणही हा गट करणार आहे