मुस्लिमांनी मागितली राहुल गांधी यांच्याकडे सुरक्षेची हमी

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून काल मुस्लीम समाजात काम करणार्‍या स्वयंसेवी संघटनांच्या प्रमुखांची भेट घेतली. तेव्हा या लोकांनी देशातल्या मुस्लीम समाजाला आर्थिक पॅकेज देण्याच्या आधी सुरक्षितता प्रदान करावी, अशी आग्रहाने मागणी केली. सरकार अनेक प्रकारचे पॅकेजेस् जाहीर करते, परंतु समाज सुरक्षित नसेल तर त्या पॅकेजेस्चा लाभ समाजाला होणार नाही, असे या नेत्यांनी राहुल गांधी यांना बजावले.

मुस्लीम समाज एकवटपणे मतदान करतो, असा राजकारण्यांचा समज असल्यामुळे या समाजाला आपलेसे करण्याकरिता विविध राजकीय पक्षात चढाओढ लागलेली असते. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी यांनी मुस्लीम समाजाचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

त्यांच्या भेटीसाठी काल अनेक मुस्लीम संघटनांचे प्रमुख आले होते. त्यांच्यासमोर बोलताना राहुल गांधी यांनी या समाजाच्या उत्कर्षासाठी चांगल्या शिक्षणाची गरज असल्याचे सांगितले. कॉंग्रेसमध्ये काम करणार्‍या काही मुस्लीम नेत्यांनी मुस्लीम समाजाच्या मनात कॉंग्रेसविषयी आशा निर्माण झाली असल्याचे नमूद केले.