वाराणसीत मोदींना विश्वनाथ मंदिरात न जाण्याची विनंती

वाराणसी- वाराणसीतील विश्वनाथ मंदिर आणि संकट मोचन हनुमान मंदिरात नर्रेंद्र मोदी यांनी दर्शनासाठी जाऊ नये अशी चिठ्ठी वाराणसीचे जिल्हाधिकारी प्रांजल यादव यांनी लिहिली असल्याचे समजते.आज शुक्रवारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची शंखनाद रॅली होत आहे. या रॅलीपूर्वी मोदी वरील दोन्ही मंदिरांना भेट देणार आहेत.

यासंबंधी अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी यादव म्हणाले की मोदींच्या सभेला किमान ३ लाख लोक येतील असा अंदाज आहे. इंटेलिजन्स ब्युरोकडून मोदींच्या जीवाला धोका असल्याचा इशारा आम्हाला दिला गेला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचे सर्व उपाय योजले गेले आहेत. आज शुक्रवार असल्याचे नमाजाचा दिवस आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मोदी यांनी विश्वनाथ मंदिर आणि संकट मोचन हनुमान मंदिरात जाऊ नये अशी विनंती करणारे पत्र आम्ही लिहिले आहे. अर्थात कुणालाच देवाचे दर्शन घेण्यापासून थांबविता येणार नाही याची कल्पना आहे. मात्र सुरक्षेवर अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून मोदींना अशी विनंती केली गेली आहे. अर्था त्यांना मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांना अडविले जाणार नाही.

सकाळी ११ च्या सुमारास मोदी वाराणसीत पोहोचत आहेत. त्यांची उत्तर प्रदेश पूर्वांचलमधली ही पहिलीच सभा असून त्यांच्यासोबत राजनाथसिंह, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंह यांच्यासह अनेक वरीष्ठ नेतेही आहेत. झांशी कानपूर येथील कांही समाजद्रोही मंडळींपासून मोदींना धोका असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने उत्तर प्रदेश सरकारला दिला आहे. परिणामी राज्य पोलिसांबरोबरच गुजराथ पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दले वाराणसीत तैनात करण्यात आली आहेत.