राज्याराज्यातून निवडणूकपूर्व युतीसाठी काँग्रेसची चाचपणी

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकांत पुन्हा एकदा सत्ता हस्तगत करण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली असून राज्याराज्यातून तेथील स्थानिक पक्षांबरोबर युती करण्याचा निर्णय निवडणूक पूर्व युती कमिटीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार ज्या राज्यातून काँग्रेसने पूर्वीच युती केली आहे ती टिकविण्याचा तर जेथे अशी युती नाही तेथे त्या करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बंगालमध्ये मात्र स्वबळावरच लढण्याचा काँग्रेसचा विचार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार झारखंडमध्ये झारखंड युवा मोर्चाशी युती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर उत्तर प्रदेशात मायावतींच्या बसपाला वश करून घेण्यासाठीची कोशिश सुरू आहे. बिहारमध्ये दागी लालू प्रसाद व रामविलास पास्वान यांना चुचकारले जाणार आहे तर राजस्थानात किराडो मीणांच्या पक्षांबरोबर बोलणी करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीबरोबर असलेली युतीच कायम ठेवली जाणार आहे तर जम्मू काश्मीरमध्येचही नॅशनल कॉन्फरन्सबरोबरची युती टिकविली जाणार आहे  तमीळनाडून डीएमके यांच्याबरोबरच्या युतीची आशा कायम आहे मात्र ते शक्य न झाल्यास अन्य छोट्या प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी केली जाणार आहे. आंध्रात निवडणूक पूर्व युती न करता निवडणुकांनंतर युतीसाठी चाचपणी केली जाणार आहे. एकंदर धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये अशी काळजी घेऊनच पावले टाकली जात आहेत.

दुसरीकडे भाजपची २४ डिसेंबरला बैठक होत असून त्यात १७ राज्यातील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. जानेवारीत ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. मोदी एकाच जागेवरून निवडणूक लढविणार आहेत मात्र ही जागा गुजराथमधली का उत्तर प्रदेशातली याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग  यांनी गेल्या तीन दिवसांत १७ राज्यातील प्रभारींशी चर्चा केली आहे.

राजनाथसिंग गाझियाबाद, नितीन गडकरी नागपूर, शहानवाझ हुसेन भागलपूर, सुषमा स्वराज विदिशा अथवा भोपाळ, मुरली मनोहर जोशी वाराणसी, राजीव प्रसाद रूडी छपरा, अनंतकुमार द.बंगलोर, यशवंत सिन्हा हजारीबाग असे उमेदवार निश्चित असून वरीष्ठ नेते लालकृष्ण आडवानी गांधीनगर मधून असतील असे सांगितले जात आहे. मात्र निवडणूक लढवायची का नाही याचा पूर्ण निर्णय लालकृष्ण आडवानी यांनीच घ्यायचा आहे असेही समजते.

Leave a Comment