सिंगापूरमधून ५२ भारतीयांची परत पाठवणी

सिंगापूर – लिटिल इंडिया भागात ८ डिसेंबर रोजी उसळलेल्या दंगल प्रकरणात ५२ भारतीय नागरिकांना सिंगापूरमधून भारतात परत पाठविले जात असून गुरूवारपासूनच ही परतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दंगल प्रकरणात १६ जणांची चौकशी संबंधित कमिटीने केली आहे तसेच दंगलीच्या वेळी या भागात हजर असणार्‍या २०० दक्षिण आशियाई कामगारांना कायदा सुव्यवस्था पाळण्याचा कडक इशाराही दिला गेला आहे असे परराष्ट्रमंत्री के. षण्मुगम यांनी स्पष्ट केले आहे.

८ डिसेंबर रोजी लिटल इंडिया भागात बसच्या अपघातात कीवेल कुमारवालू या भारतीयाचा मृत्यू झाल्यानंतर या भागात दंगल झाली. गेल्या चाळीस वर्षात अशी दंगल होण्याचा सिंगापूरमधला हा पहिलाच प्रसंग आहे. यावेळी उसळलेल्या हिंसाचारात सात जण ठार तर अनेक जण जखमीही झाले होते. सिंगापूर पोलिसांसह होम टीमचे ३९ कर्मचारीही जखमी झाले होते व २५ पोलिस वाहनांची मोडतोड करण्यात आली होती. त्यावेळी या हिंसाचारात सहभागी असलेल्या अनेकांना अटक करून त्यांची चौकशी करण्यात आली व त्यातील ५२ भारतीयांना परत मायदेशी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. आणखी २८ जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यांचा निकाल सोमवारी लागण्याची शक्यता असल्याचे समजते.