वॉशिग्टन – जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेची आर्थिक स्थिती अजूनही नाजूकच असून येत्या तीन ते पाच वर्षात पुन्हा एकदा देशाला आर्थिक मंदीचा तडाखा बसेल असे अर्थशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अनेक उपाययोजना आणि प्रयत्न करूनही अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारत नसल्याचेच दिसून येत असल्याचे या तज्ञांचे म्हणणे आहे.
चीनचे वाढते कर्ज ही अमेरिकन अर्थव्यवस्थेसमोरील सर्वात मोठी समस्या आहे तर दुसरीकडे बेरोजगारी अजूनही दोन अंकी आहे. ताज्या आकडेवारीनुसार प्रथमच अमेरिकेवर चीनचे कर्ज वाढून ते १३०० अब्ज डॉलर्स पलिकडे गेले आहे. चीनच्या ३६६० अब्ज डॉलर्सच्या परकीय चलन भांडारात ४० टक्के हिस्सा अमेरिकन डॉलर्सचा आहे. अमेरिका चीनबरोबरच जपानचाही कर्जदार आहे. हा आकडा ११७० अब्ज डॉलर्स इतका आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या म्हणण्यानुसार अर्थव्यवस्थेच्या १२ पैकी १० क्षेत्रात किरकोळ सुधारणा दिसत असली तरी १० टक्के बेरोजगारी ही चिंतेची बाब आहे. नवीन नोकर्या निर्माण होत नाहीत आणि विकासदरही २.४ टक्कयांवरच आहे. अमेरिकेची आर्थिक परिस्थिती बिघडण्याची अनेक कारणे असली तरी गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढती दरी हे सर्वात धोकादायक असल्याचे अर्थतज्ञांचे मत आहे.