कोहलीची बॅटिंग पाहून सचिनची आठवण होते-डोनाल्ड

जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत, विराट कोहलीने सचिनच्या जागी, म्हणजे चौथ्या क्रमांकावर येऊन दमदार शतक ठोकले आहे. टीम इंडियाचा युवा फलंदाज विराट कोहलीची दमदार बॅटिंग पाहून, मला मास्ट र ब्लास्टनर सचिन तेंडुलकरची आठवण आली, असे दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्डने स्तुतीसुमने उधळली आहेत.

आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत, विराट कोहलीने १८१ चेंडूंत १८ चौकारांसह ११९ धावा केल्या. त्यामुळे भारताला पहिल्या दिवसअखेर पाच बाद २५५ अशी समाधानकारक धावसंख्या उभारता आली. यावेळी बोलताना डोनाल्ड म्हणाला, भारतीय संघ १९९६ साली आफ्रिकेच्या दौऱ्यावर आला होता. तेव्हा एकट्या सचिनने आमच्या जबरदस्त मा-याला ताकदीने तोंड दिलं होतं. अगदी तसंच काहीसं आज घडताना बघायला मिळाले.

सचिनची जागा घ्यायला आपण सज्ज असल्याचे विराटने दाखवून दिले आहे. त्याच्या फलंदाजीत शिस्त आणि आक्रमकतेचा मिलाफ होता. त्याने सुंदर बचाव केला आणि खराब चेंडूंचा समाचारही घेतला. आम्हाला दुसऱ्या दिवशी नवा चेंडू हुशारीने वापरावाच लागेल, असंही डोनाल्ड म्हणाला.

दरम्यान, पहिला दिवस समाधान देणारा होता, असे विराट कोहलीने म्हटलं आहे. मी शेवटपर्यंत टिकून राहाणे आवश्यक होते. पण सध्याची स्थितीही समाधानकारक आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेत पहिल्या दिवशी २५० धावा केल्या आहेत. ही धावसंख्या समाधानकारक आहे, असे कोहली म्हणाला.

Leave a Comment