इन्फोसिस करणार १६ हजार इंजिनिअर्सची भरती

मुंबई – पुढच्या वर्षात भारतातील दोन नंबरची आय.टी.कंपनी इन्फोसिस १६ हजार इंजिनिअर्सना नोकरी देणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे कंपनीचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी सांगितले. मुंबईतील एका समारंभात ते बोलत होते.

मूर्ती म्हणाले की अमेरिका आणि युरोपियन मार्केटमध्ये आऊटसोअर्सिंगसाठीची मागणी वाढली आहे. त्यातून भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला १०८ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळणार आहे. परिणामी सॉफ्टवेअर इंजिनिअर्सनाही मागणी वाढते आहे. याचा फायदा भारताने उठवायला हवा. भारतात कृतीपेक्षा पोकळ बोलण्याला अधिक महत्त्व दिले जाते. केवळ मेरा भारत महान म्हणून भागणार नाही तर येणारी प्रत्येक स्पर्धा जिंकण्याची सवय अंगी बाणायला हवी. तरच भारत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जगात पहिल्या नंबरवर जाऊ शकणार आहे.

विद्यार्थ्यांनी आहे तेच पुढे चालविण्यापेक्षा नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्पर्धेसाठी जे पूर्णपणे तयार असतील त्यांच्याबरोबर नशीबही असेल असे सांगून मूर्ती म्हणाले की देशातील आर्थिक वातावरण लवकरच बदलेल. व्यवसायवाढीचे संकेत मिळत आहेत म्हणजेच महसूलही वाढणार आहे. त्या महसूलाचा योग्य विनियोग केला तर भारताला विकासात कुठेच अडथळा नाही.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल यावर लक्ष केंद्रीत केले गेले पाहिजे. विद्यार्थी हेच भारताचे भाग्यविधाते आहेत. उत्तम गुणवत्ता असलेले सॉफ्टवेअर इंजिनिअरच भारताला सॉफवेअर क्षेत्रात ग्लोबल जायंट बनवू शकणार आहेत असेही ते म्हणाले.