दिल्लीत आम आदमीची सत्ता येणार ?

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून पडलेला दिल्लीतील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाचे नेते शुकवारी राज्यपालांना भेटणार आहेत. त्यामुळे राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आम आदमीचे नेते राज्यपालांची भेट घेवून सत्ता स्थापनेचा दावा करणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत आम्ही कोणाचाही पाठिंबा घेणार नाही किंवा देणार नाही असा दावा आप नेते करत होते. मात्र, आता दिल्लीत आम आदमी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर कुमार विश्वास यांनी खळबळ उडवून दिली असून आता आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचे कुमार विश्वास यांनी सांगितले आहे.

राजधानीत भाजपला सर्वात जास्त ३२ जागा मिळल्या आहेत. तर आम आदमी पार्टीला २८, काँग्रेसला ८ आणि इतरांना दोन जागा मिळाल्या आहेत. मात्र सत्ता स्थापनेसाठी आवश्य बहुमत कोणत्याही पक्षाकडे नाही. त्यामुळे आता आम आदमी पार्टी कोणाशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.