बिहारमधील तरूणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार

मुंबई- बिहारमधून प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी पळून आलेल्या २० वर्षीय तरुणीवर नागपाडा परिसरात सामूहिक बलात्कारचा गंभीर प्रकार घडला. ज्या प्रियकरासोबत ती लग्न करणार होती, त्याच्याच मित्रांनी तिच्यावर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला असल्याीचे समजते. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली.

पीडित तरुणी ही मूळची बिहारमधील रोहतास येथील राहिवासी असून, तिचे तिच्या मैत्रिणीच्या भावासोबत प्रेमसंबंध होते. पण, तिचा प्रियकर दुस-या धर्मातील असल्यामुळे तरुणीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. पीडित मुलीने हा प्रकार तिच्या प्रियकराच्या कानावर घातला व आपण मुंबईला येत असल्याचे त्याला सांगितले. प्रियकराला सांगितल्याप्रमाणे पीडित तरुणी ४ डिसेंबरला बिहारहून निघाली व ६ डिसेंबरला कल्याण येथे पोहोचली. त्या वेळी तिने प्रियकराशी संपर्क साधला असता, त्याने त्याचा मित्र मोबीन याला दूरध्वनी करून बोलावून घेतले. त्याला एक हजार रुपये देऊन त्याच्या प्रेयसीला मुंबईत सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास सांगितले.

त्यानुसार मोबीन तरुणीला नागपाडा बेतवाली चाळ येथील अली मोहम्मद याच्या घरी घेऊन गेला. ती एकटीच असल्याचा फायदा घेऊन शनिवारी पहाटे तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर घाबरलेल्या तरुणीने अली मोहम्मद याला हा प्रकार सांगितला. त्याबाबत तिला मदत करण्याऐवजी मोहम्मद याने तिला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर शनिवारी दुपारी बलात्कार केला. या प्रकरणानंतर पीडित मुलीने संधी साधून तेथून पळ काढला.त्या वेळी तेथून गस्ती घालणा-या पोलिसांनी तिची विचारपूस केली असता, तिने संपूर्ण प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यानुसार या प्रकरणी पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून घटनास्थळी पोलिस गेले. तेथे अली त्याच घरात सापडला. तर मोबीनला पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.