विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीत विक्रमी 66 टक्के मतदान

नवी दिल्ली -विधानसभा निवडणुकीसाठी आज दिल्लीत विक्रमी 66 टक्के मतदान झाले. या निवडणुकीकडे काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्षातील (आप) तिरंगी लढत म्हणून पाहिले जात आहे. दिल्लीत एकूण 1.19 कोटी इतके मतदार आहेत. त्यातील सुमारे 80 लाख मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला.

या मतदानामुळे निवडणूक रिंगणात उतरलेल्या 810 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बंद झाले. दिल्लीत आज झालेले मतदान मागील दोन दशकांतील सर्वाधिक ठरले. विधानसभेच्या 2003 मधील निवडणुकीत 53.42 टक्के तर 2008 मध्ये 57.58 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

यावेळी मतदारांनी आपला हक्क बजावण्यासाठी मोठा उत्साह दाखवला. सायंकाळी 6 च्या सुमारास तब्बल 70 हजार मतदार रांगा लावून उभे होते. मतदान शांततेत पार पडले. मतदानादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.