मुलाच्या सुटकेसाठी राणेंचा पर्रीकर यांना फोन

पणजी – मुलाच्या (नितेश) सुटकेसाठी महाराष्ट्राचे मंत्री नारायण राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दूरध्वनी केला होता. स्वत: पर्रीकर यांनीच याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्र-गोवा सीमेवरील टोलबुथच्या कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी काल नितेश राणे यांना काही समर्थकांसह गोवा पोलिसांनी अटक केली.

या पार्श्‍वभूमीवर, नारायण राणे यांनी आपल्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्याची माहिती आज पर्रीकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. संबंधित प्रकरणात लक्ष घालून शक्य असेल तर नितेश यांची सुटका करण्याची विनंती राणेंनी केली. त्यावर आपण त्यांना न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला. राणेंची विनंती मान्य करण्यास मी नकार दर्शवल्यावर त्यांनी बिल्कूल राग व्यक्त केला नाही. त्यांची प्रतिक्रिया अतिशय सकारात्मक होती, असे पर्रीकर यावेळी म्हणाले.

कालच्या प्रकरणात नितेश यांचा अंशत: सहभाग होता. इतर पाच जणांनी कर्मचार्‍याला मारहाण आणि बुथची तोडफोड केली, असेही पर्रीकर यांनी नमूद केले. टोल भरण्यासाठी नितेश यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून कालचे प्रकरण घडले नाही. पाचशे रुपये त्यांच्यासाठी काहीच नाहीत. मात्र, कालच्या प्रकरणात अधिकार दाखवण्याचा प्रयत्न झाला, अशी पुस्ती पर्रीकर यांनी जोडली.