जेलमध्ये हत्येच्या आरोपीसोबत तेजपालची रात्र

पणजी- ‘तहलका’चो संपादक तरुण तेजपाल यांना सहकारी पत्रकार तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप ठेवून अटक करण्यापत आली. तेजपालची पोलीस कोठडीतील पहिली रात्र हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या दोघा आरोपींसोबत काढावी लागली. दरम्यान, तेजपाल यांना पोलीस रविवारी सुट्टीकालीन न्यायालयात हजर करणार आहेत.

तेजपाल यांना ९.२० वाजताच्या सुमारास पोलीस अधिकारी सुनीता सावंत यांच्या पथकाने अटक केली. त्यानंतर लगेचच त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे रात्री बारा वाजता त्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास पणजी पोलिसांनी मुख्यालयातील कोठडीत तेजपाल यांची रवानगी केली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेजपाल यांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले त्यात त्यांच्याशिवाय आणखी तीन आरोपी आहेत. त्यातील दोघांवर हत्येचा आरोप आहे तर तिसऱ्याला समाजविरोधी कृत्य केल्याच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.कोठडीत अन्य आरोपींकडे फारसे लक्ष न देता तेजपाल शांतपणे बसले होते. वैद्यकीय तपासणीनंतर कोठडीत नेले जात असताना माध्यमांनी तेजपाल यांचा पिच्छा पुरवला. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला पण, ब्र शब्दही न काढता तेजपाल निघून गेले.