दाभोळकर हत्येचे राजकारण

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी हिंदुत्वविरोधी राजकारण करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत मात्र ते सापडण्याच्या आधीच ते हिंदुत्ववादी संघटनांचे आहेत असा गाजावाजा करून ऐन निवडणुकीच्या काळातत भारतीय जनता पार्टीला अडचणीत आणण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. त्यातूनच कसे राजकारण रंगत चालले आहे हे बघण्यासारखे आहे. ‘धर्मांध संघटनांना क्लीन चिट’ ही बातमी वाचली म्हणजे आपल्या समाजामध्ये लोक किती अतार्किक वागत, बोलत आणि लिहीत असतात हे लक्षात येते. कारण या खुनाच्या बाबतीत हिंदुत्ववादी संघटनांवर त्यांच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आलेलाच नव्हता. काही लोकांनी तो आपल्या राजकीय सोयीसाठी आपल्या हातात असलेल्या माध्यमातून केलेला होता. तेव्हा ज्याला आरोप ठेवणे असे म्हणतात असा काही प्रकार झालाच नाही तर क्लीन चिट दिलीच कशी? पण बातम्या देणार्‍यांनीही त्याचा ङ्गार विचार केलेला नाही. या हत्येमागे कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनेचा हात नाही असे त्यांच्या हत्येचा तपास करणार्‍या पोलिसांनी उच्च न्यायालयात नमूद केले आहे. न्यायालयाची भाषा आणि बातमीची भाषा यामध्ये ङ्गार माेठा ङ्गरक असतो. मात्र हा ङ्गरक न जाणणारे काही पत्रकार पत्रकारितेत घुसले असल्यामुळे त्यांनी न्यायालयातल्या निवेदनाचा सनसनाटी अन्वयार्थ काढून दाभोळकरांच्या हत्येच्या संबंधात, ‘हिंदुत्ववादी संघटनांना क्लीन चिट’ असे मथळे आणि ब्रेकिंग न्यूज झळकवल्या आहेत.

दाभोळकरांच्या हत्येच्या संबंधात तर त्यांच्या कथित समर्थकांनी विशेषत: त्यांचे खरे समर्थक आपणच आहोत असा भास निर्माण करणार्‍या काही पत्रकारांनी अनेक गोंधळ घालून ठेवले आहेत. दाभोळकर हे अंधश्रद्धांच्या विरोधात संघर्ष करत होते ही गोष्ट खरी आहे आणि त्यांच्या काही सुधारणांच्या कार्यक्रमांना हिंदुत्ववादी आणि अन्य धार्मिक संघटनांचा विरोध होता. मात्र या गोष्टीवरून त्यांचा खून या संघटनांपैकीच कोणी तरी केलेला आहे असा होत नाही. तर्कशुद्ध विचार केला असता तसा तो होत नाही. परंतु दाभोळकरांच्या हत्येनंतर काही समाजवादी पुढार्‍यांनी लिहिलेल्या लेखांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांवर तसा थेट आरोप केला. ‘दाभोळकरांची हत्या हिंदुत्ववादी संघटनांनीच केली आहे यात तीळमात्र शंका नाही’ अशी विधाने भाई वैद्य यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा केली. मग निखील वागळेसारख्या किरकोळ पत्रकारांची गोष्टच वेगळी. त्यांनी तर जमेल तिथे हिंदुत्ववादी संघटनांची बदनामी करण्याची सुपारीच घेतली आहे आणि जमेल तिथे दाभोळकरांच्या खुनाबद्दल हिंदुत्ववाद्यांकडे बोट दाखवायला सुरुवात केलेली आहे. हिंदुत्ववाद्यांनी नक्कीच ही हत्या केली आहे असे म्हणणारे हेच लोक दाभोळकरांच्या प्रत्येक मासिक श्राद्धाला अजून आरोपी का सापडत नाहीत म्हणून सरकारला जाब विचारत आहेत.

दाभोळकरांची हत्या नक्कीच हिंदुत्ववाद्यांनी केली आहे असा जर त्यांचा पक्का समज आहे तर तो कशातून झाला आहे याचे पुरावे हे लोक पोलिसांना का देत नाहीत? आणि त्यांच्याकडे पुरावे नसतील तर हिंदुत्ववाद्यांकडे कशाच्या आधारावर बोट दाखवत आहेत? असे बोट दाखवण्यामागचे राजकीय हेतू लपून रहात नाहीत. महात्मा गांधींची हत्या केल्याबद्दल संघाला बदनाम करणारे लोक अशी हिंदुत्ववादी संघटनांची बदनामी करण्याची एक संधी म्हणून दाभोळकरांच्या खुनाकडे पहात आहेत. सुपारी घेऊन बदनाम करायचेच म्हटल्यास पुरावे विचारतो कोण? चॅनेल आपल्याच ताब्यात आहे, पुरावे विचारायला लागला की, ताबडतोब एक ब्रेक घेण्याची युक्ती आपणच करू शकतो. अशापैकीच एका वावदुक व्यक्तीने एक याचिकाही दाखल केली आणि आरोपी का सापडत नाहीत, असा प्रश्‍न केला. याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने पोलिसांना पाचारण केले. परंतु पोलिसांना अजून तरी पुरावेच सापडलेले नाहीत. तेव्हा त्यांना लिहून द्यावे लागले. हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप करता येईल असा पुरावा आपल्याला तरी सापडलेला नाही असे त्यांना लिहून द्यावे लागले. दाभोळकरांच्या हत्येचे राजकारण करून कॉंग्रेसवाल्यांना खूश करण्यासाठी टपलेले सारे समाजवादी पुढारी आणि कॉंग्रेसवाल्यांनी खिशात टाकलेले पत्रकार पोलिसांच्या या निवेदनाने अक्षरश: तोंडावर आपटलेले आहेत.

यावर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे आणि पोलिसांचे कोर्टातले निवेदन ही हिंदुत्ववाद्यांना दिलेली क्लीन चिट नाही, असा खुलासा केला आहे. क्लीन चिटचा अर्थ त्यांनाही नीट कळलेला नाही. ज्याच्यावर आरोप असतो त्याच्यावरचा तो आरोप निराधार ठरला की, त्याला क्लीन चिट दिली असे म्हणतात. मग आर. आर. पाटलांच्या गृहखात्याने हिंदुत्ववाद्यांवर आरोपच ठेवला नव्हता तर क्लीन चिट देण्याचा किंवा न देण्याचा प्रश्‍नच कुठे येतो? तेव्हा आर.आर. पाटलांचे हे म्हणणे सुद्धा वावदूकपणाचेच आहे. पोलिसांचे कोर्टात दिलेले निवेदन आणि क्लीन चिट यांचा काहीही संबंध नाही. पोलिसांना अजून कसलेच पुरावे मिळालेले नाहीत. तेव्हा ज्याला कोणाला ज्याच्याविषयी शंका येते त्या सर्वांना तसे म्हटले तर ही क्लीन चिटच आहे. पण तसे म्हटले तर. आरोपी सापडतील तेव्हा सापडतील पण दरम्यानच्या काळात पुरावे सापडो की न सापडोत समाजवादी आणि कॉंग्रेसचे नेते हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात दाभोळकरांच्या हत्येचा वापर करून राजकारण करत राहणार आहेत. कारण त्यांच्यासाठी तो पोटापाण्याचा विषय आहे.