पैसा खर्च करताना पारदर्शक व्यवहार ठेवा- अजीत पवार

पुणे – जनतेने निवडून दिल्याने आपण येथे आहोत; पण महापालिका आपल्या मालकीची नाही, असा घरचा आहेर देत त्यांनी पदाधिका-यांना समाजाचा पैसा खर्च करताना आपण मालक नाही, तर विश्वस्त आहोत, याचे भान बाळगा, जनतेचा पैसा खर्च करताना पारदर्शक व्यवहार ठेवा, अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधा-याना दिल्या.

स्थायी समितीलाच पालिकेसाठी आवश्यक औषधांची खरेदी खूप महागात केल्याचे वृत्तपत्रातून समजले. खरे-खोटे काय झाले, हे अधिक ठाऊक असेल. परंतु, समाजाचे पैसे खर्च करताना त्याबाबत पारदर्शक व्यवहार अपेक्षित आहे,’ असा सल्ला त्यांनी दिला. पुणे महापालिकेच्यावतीने सीएनजी किट बसविणा-या रिक्षामालकांना अनुदान वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते घेण्यात आला. या वेळी बोलताना त्यांनी समाजाचा, जनतेचा पैसा खर्च करताना नियमाने केला पाहिजे, अशी सूचना त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि अधिका-यांना केली. महापौर चंचला कोद्रे, महापालिका आयुक्त महेश पाठक, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांच्यासह स्थानिक नगरसेविका पुष्पा कनोजिया, मोनिका मोहोळ; तसेच शंकर केमसे या वेळी उपस्थित होते.

अग्निशामक दलाच्या जवानांसाठी महागडी हेल्मेट खरेदी, राज्य सरकारपेक्षा दुप्पट दराने आरोग्य खात्याची औषध खरेदी यासारखे काही विषय सध्या पालिकेमध्ये चर्चेत आहेत. एलबीटीतून अपेक्षित महसूल मिळत नसल्याने आयुक्तांनी खर्चाला कात्री लावली असूनही याप्रकारे उधळपट्टी सुरू असल्याचे वारंवार समोर येत आहे.

Leave a Comment