भाजपाचा भ्रष्टाचार कॉंग्रेसपेक्षा जास्त

बन्सवारा – कॉंग्रेस पक्ष विकासाच्या बाबतीत भाजपाच्या पुढे आहे, पण भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाराच्या बाबतीत कॉंग्रेसपेक्षा पुढे आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत भाजपाने कॉंग्रेसवर मात केलेली आहे आणि आम्ही आमचा हा पराभव मान्य करत आहोत, अशा उपहासात्मक भाषेत राहुल गांधी यांनी राजस्थानातील जाहीर प्रचार सभेत भाजपाला लक्ष्य केले.

भाजपाचे नेते भ्रष्टाचारात कसे आघाडीवर आहेत हे बघण्यासाठी ङ्गार दूर जायची गरज नाही. जिथे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्या कोणत्याही राज्यात आपण त्यांचा भ्रष्टाचार बघू शकतो, असे श्री. राहुल गांधी म्हणाले. त्यांनी तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले. युवकांना रोजगार पाहिजे ही गोष्ट खरी आहे, पण राजकारणात सुद्धा युवकांची गरज आहे असे ते म्हणाले.

आदिवासी, गरीब या वर्गातून आमदार-खासदार पुढे यावेत, एवढेच नव्हे तर देशाचा पंतप्रधान सुद्धा आदिवासीतून व्हावा हे दृश्य आपल्याला बघायचे आहे. कारण आदिवासींकडे बुद्धीमत्ता आहे असे प्रतिपादन करून राहुल गांधी यांनी आदिवासी मतदारांची मते आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस पक्षाचे राजकारण दलीत आणि आदिवासींसाठी आहे असे ते म्हणाले.