नवी दिल्ली – तेहलका डॉट कॉम या ऑन लाईन दैनिकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्या विरोधात गोव्याच्या एका न्यायालयाने काल अजामीनपात्र वॉरंट जारी केले. आता त्यांना पोलिसांसमोर शरण यावेच लागेल, अन्यथा त्यांना अटक करून न्यायालयापुढे उभे केले जाऊ शकते. दरम्यान, तरुण तेजपाल यांनी आपला अटकपूर्व जामीनासाठी अर्ज मागे घेतला आहे.
तरुण तेजपाल यांना आता जामीन मिळणार नाही हे लक्षात येताच गोव्याच्या पोलिसांनी त्यांना हजर राहण्याचा आदेश दिला. मात्र तेजपाल यांच्या वकिलाने हजर राहण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली. तीही न्यायालयाने ङ्गेटाळून लावल्यामुळे शुक्रवारपर्यंत पोलिसांसमोर हजर होणे त्यांच्यासाठी आवश्यक झाले आहे.
तरुण तेजपाल यांच्यावर एका सहकारी पत्रकार महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या आरोपामुळे देशभर खळबळ उडाली आहे, पण तेजपाल यांनी बरीच सारवासारव करून अटक टाळण्याचा प्रयत्न केला. हा सारा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आता त्यांची अटक अटळ ठरली आहे.