आता सर्वच महापौर आणि आयुक्तांना ’लाल दिवा’

पिंपरी-चिंचवड : महापौरांच्या मोटारीला पुन्हा लाल दिवा आणि आयुक्तांच्या मोटारीला अंबर दिवा लावण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या नव्या आदेशामुळे राज्यातील सर्वच महापौर आणि महापालिका आयुक्तांच्या मोटारींवर पुन्हा ’दिवेलागण’ होणार आहे.

अतिमहत्त्वाच्या आणि महत्त्वाच्या व्यक्ती व अधिका-यांच्या वाहनांवर लाल किंवा अंबर दिवा लावण्याबाबतच्या आदेशाचा फॅक्स उपसचिव ज. ना. पाटील यांच्या सहीने सर्व महापालिकांना पाठविण्यात आला आहे. मोटारीवर लाल अथवा अंबर दिवा लावण्याची परवानगी असलेल्या पदाधिकारी व अधिका-यांच्या मोटारींच्या क्रमांकांची यादी तयार करून ती गृह (परिवहन) विभागास पाठविण्यास सांगण्यात आले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार सप्टेंबर महिन्यात महापौर आणि आयुक्तांच्या मोटारीचे अनुक्रमे लाल आणि अंबर दिवे काढले होते. याबाबत महापौर मोहिनी लांडे यांनी विनंती करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच इतर संबंधित विभागांना निवेदन देऊन लाल दिवा ठेवण्याची मागणी केली होती. लाल दिव्यासाठी आयुक्त (बृहन्मुंबई महापालिका) आणि महापालिकेचे महापौर यांचा समावेश असून महापौरांना लाल दिव्याचा वापर त्यांच्या अधिकार क्षेत्रापुरताच करता येईल. अंबर दिव्याचा वापर सर्व ’ब’ , ’क’ आणि ’ड’ वर्ग महापालिकेचे आयुक्त, ’अ’ दर्जाच्या महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, महापालिका, नगरपालिका यांची अग्निशमन वाहने यांना करता येईल.