मुंबई – आंध्र प्रदेशचे विभाजन रोखण्याच्या उद्देशाने विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी सध्या प्रयत्नशील आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून आज जगन यांनी येथे केंेद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, पवारांकडून पाठिंब्याबाबतचे ठोस आश्वासन मिळवण्यात जगन यांना अपयश आले.
दरम्यान, जगन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. जगन यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, तेलंगण राज्याला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने नऊ वर्षांपूर्वीच घेतला होता. आमच्या भूमिकेबाबतची माहिती जगन यांना आहे. मात्र, त्यांनी चर्चेवेळी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. कुठल्याही राज्याच्या विभाजनाचा निर्णय घेताना केंद्र सरकारने राज्य विधानसभेला विश्वासात घ्यावे, असा एक मुद्दा त्यांनी मांडला.
स्वतंत्र राज्याच्या निर्मितीशी संबंधित घटनेच्या कलम 3 मध्ये दुरुस्ती व्हावी, असा त्यांचा दुसरा मुद्दा होता. जगन यांनी मांडलेले मत आपण राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीसमोर ठेवणार आहोत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. आजच्या भेटीवेळी जगन यांनी एक निवेदन आपल्याला दिले. राज्याचे विभाजन केले जाऊ नये अशी आंध्रच्या जनतेची इच्छा असल्याचा दावा त्यांनी निवेदनाद्वारे केला असल्याचेही यावेळी पवारांनी सांगितले. कुठलीही राजकीय जुळणी किंवा निवडणूक समझोत्याबाबत या भेटीत चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.