तरुण तेजपाल यांना अटकेची शक्यता

पणजी: एका महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांना अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी गोवा पोलिस तक्रार दाखल करून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची शक्यता आहे. आगामी काळात तरूण तेजपाल यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावा यासाठी दबाव वाढत चालला आहे.

तहलकाचे संपादक तरूण तेजपाल हे देशाबाहेर गेले नसल्याची माहिती तहलकाने दिली आहे. एका महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली देत तेजपाल यांनी सहा महिन्यासाठी पदावरुन दूर होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यामुळे ते कायदेशीर कारवाईपासून वाचू शकत नाहीत अशी भूमिका महिला संघटनांनी घेतली आहे.
याप्रकरणाच्या प्राथमिक चौकशीचे आदेश गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले आहेत.

“प्राथमिक चौकशीसाठी कोणत्याही तक्रारीची गरज नाही. राज्यात एखादा गुन्हा घडला, तर तक्रार असो वा नसो, प्राथमिक चौकशी करणं, ही आमची जबाबदारी आहे”, असे पर्रिकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांना अटक होण्याची शक्यता आहे.