अमेरिकेला अद्यापही दहशतवादी हल्यांचा धोका

वॉशिग्टन – अल कायदा या दहशतवादी संघटनेचे कंबरडे अमेरिकेने मोडले असले तरी अल कायदाशी संबंधित अन्य संघटनांकडून अमेरिकेवर दहशतवादी हल्ले होण्याचा धोका संपलेला नाही असे राष्ट्रीय सुरक्षा व दहशतवाद विरोधी विभागातील वरीष्ठ अधिकार्‍यानी स्पष्ट केले आहे.

या विभागातील अधिकारी व अमेरिकन अध्यक्ष ओबामा यांच्या सहकारी लीसा मोनेको या संदर्भात बोलताना म्हणाल्या की अमेरिकेने दहशतवादाचा बिमोड करण्यात मोठे यश मिळविले आहे हे सत्य असले तरी आमच्या देशाला दहशतवाद्यांकडून असलेले धोका कायम आहे ही हकीकत आहे. अल कायदाचा म्होरक्या ओसामा लादेनचा खातमा केल्यानंतर मूळ अल कायदा संघटना कमजोर झाली असली तरी आम्ही दहशतवादी संघटनांवरचे लक्ष कमी केलेले नाही कारण आमच्या राजनैतिक केंद्रांवर, व्यापारी केंद्रांवर व आमच्या नागरिकांवर दहशतवादी हल्ले होत राहणार याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे.

अल कायदाच्या अरब देशांतील संघटना अमेरिकेवर हल्ले करण्यासाठी तयार आहेत आणि त्या संधीची वाट पाहात आहेत. आता आम्हाला असलेला धोका नवीन मार्गाने होण्याची शक्यता असून उदाहरण द्यायचे तर सिरीयात असद सरकार आणि विरोधकांत जो संघर्ष पेटला आहे त्यात अल कायदाशी संबंधित दहशतवादी गट प्रबळ होत आहेत. या प्रकारे विखूरलेल्या दहशतवाद्यांपासून असलेला धोका निपटण्यासाठी संबंधित देशांनी सहकार्य करावे यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केले जात आहेत.