भारत आणि चीन या दोन देशांमधील सोने खरेदी हा नेहमी चर्चेचा आणि कांहीसा उपहासाचा विषय असला तरी नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जगातील सर्वच देशांनी यंदाच्या वर्षात सोन्याचा साठा वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न व सोने खरेदी केली असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वाधिक इंधन साठवणूकदार देश म्हणून ओळखल्या जाणार्या रशियाने यंदाच्या वर्षात जून २०१३ पर्यंत जगात सर्वाधिक सोने खरेदी केले असून आपला सोने साठा ९९६.४ मेट्रिक टनांवर नेला आहे. यात सेंट्रल बँकची सोने खरेदी समाविष्ट नाही.जून पर्यंत सर्वाधिक सोने खरेदी करणारा रशिया हा नंबर एक वर आहे.
वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून पाहिले जात असलेल्या चीनकडेही सोन्याचा साठा १००० मे.टनांपेक्षा अधिक असून जूनपासून सोने खरेदी करणार्या देशांत त्यांचा नंबर दुसरा आहे. तिसरा क्रमांक आहे जर्मनीचा. युरोपचे इकॉनॉमिक पॉवर हाऊस अशी ओळख असलेल्या या देशाने आपला सोने साठा ३००० मे.टनांवर नेला आहे तर इटलीने २००८ सालचे तीव्र आर्थिक संकट सोसूनही आपला सोने साठा २ हजार मे.टनांवर नेला आहे. इटलीचा नंबर चौथा आहे.
तुर्कस्तान हीही जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था आहे. त्यांनी आपला सोने साठा ३१६.१ मे.टनांनी वाढविला असून जून सोने खरेदीत त्यांचा क्रमांक पाचवा आहे. व त्याखाली नंबर आहे भारताचा. भारताने जून २०१३ पर्यंतच्या सोने खरेदीत आपला साठा २०१.४ मे. टनांनी वाढविला आहे.