छत्तीसगड विधानसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदानास सुरूवात

रायपूर, – छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या दुस-या व अंतिम टप्प्यातील मतदानास मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. कडेकोट सुरक्षेत मंगळवारी सकाळी मतदानास प्रारंभ झाला. राज्यातील १९ जिल्ह्यांतील ७२ जागांसाठी मतदान होणार असून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दक्षिण छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात गेल्या निवडणुकांपेक्षा जवळपास ८ टक्के जास्त मतदान झाले. त्यामुळे आजही मोठय़ा प्रमाणात मतदान होण्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी आठच्या सुमारास मतदानाला सुरूवात झाली असून संध्याकाळी पाचपर्यंत सुरू असलेल्या मतदानादरम्यान एक कोटी ३९ लाखांहून अधिक नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. रायपूर, दुर्ग, विलासपूर, रायगड आणि अंबिकापूर यांच्यासह १९ जिल्ह्यांतील ७२ जागांसाठी मतदाना होणार आहे.

सकाळी मतदान सुरू झाल्यावर छत्तीसगडचे राज्यपाल शेखर दत्त यांनी रायपूर येथे जाऊन मतदानाचा अधिकार बजावला. तसेच राज्यातील नागरिकांना मतदान करण्याचे आवाहनही केले. मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये व निवडणुका सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील १८0१५ पैकी ४,५९४ केंद्र ही संवेदनशील तर १,३९८ अतिसंवेदनशील केंद्र घोषित करण्यात आली आहेत.