निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा अहवाल – राणे

नाशिक – मराठा आरक्षणाबाबत राणे समितीचा अहवाल निवडणुकीपूर्वी राज्य सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती नारायण राणे यांनी आज सोमवारी नाशिकमध्ये दिली. राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज नाशिक दौर्‍यात विविध संघटनांचे म्हणणे ऐकले. मराठा आरक्षणाच्या विरोधात निवेदने देण्यासाठीही यावेळी गर्दी झाली होती. दलित आणि इतर मागासवर्गीयांच्या शिष्टमंडळांनीही समितीसमोर निवेदने सादर करून मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला. सुमारे साडेतीनशे निवेदने यावेळी या समितीने स्वीकारली.

शिक्षण आणि आर्थिक बाबींमधील काही घटकांचे शासनामार्फत सर्वेक्षण करण्याची गरज असून त्यानंतरच आपण अहवाल सादर करू, असेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे या समितीला निवेदन देण्यासाठी जाताना आमदार विनायक मेटे आणि त्यांच्या समर्थकांची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी शाब्दिक चकमकही झडली. लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय झाला नाही, मराठा समाज सत्ताधार्‍यांच्या विरोधात जाऊ शकतो, असा सूचक इशाराही मेटे यांनी यावेळी दिला. तर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मात्र समितीकडे पाठ फिरवली. पण मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे ठामपणे सांगितले.