नवी दिल्ली – आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे नवे राज्य निर्माण करण्याच्या कायदेशीर आणि वैधानिक प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या कॉंग्रेस वर्किंग कमिटीची एक बैठक बोलावणार असून या बैठकीत त्या हैदराबादचे स्थान आणि सीमांध्रा भागाला द्यावयाचे मोठे पॅकेज यावर चर्चा करणार आहेत. हैदराबादच्या स्थानाबद्दल तडजोडीचा मसुदा तयार करण्यात आला आहे आणि सीमांध्रा भागातल्या जनतेची समजूत काढण्यासाठी या भागाला करोडो रुपयांचे स्पेशल पॅकेज देण्याची योजना आखण्यात आलेली आहे.
तेलंगण निर्मितीसाठी तीन प्रक्रिया आवश्यक आहेत. पहिली म्हणजे तेलंगण निर्मितीचा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर करावा लागेल आणि तो राष्ट्रपतींकडे पाठवावा लागेल. राष्ट्रपती तो ठराव वाचून विधीमंडळाकडे पाठवतील आणि आंध्र प्रदेश विधीमंडळात विभाजनाला मान्यता देणारा ठराव करावा लागेल. तो ठराव करून राष्ट्रपतींकडे पाठविला जाईल आणि राष्ट्रपती तो पुन्हा केंद्र सरकारकडे पाठवतील. संसदेत हा ठराव मंजूर झाला की, राज्याची निर्मिती होईल.
येत्या दोन-तीन दिवसात या सार्या प्रक्रिया सुरू होतील, पण दरम्यान जनतेचा तेलंगण निर्मितीला असलेला विरोध विचारात घेऊन तो विरोध कमी होण्यासाठी काही तरी करण्याची गरज आहे, असे सोनिया गांधी यांना वाटते. म्हणून त्यांनी सीमांध्रा भागातील जनतेला राजी राखण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी तेलंगण विषयात नेमण्यात आलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या समितीसमोर आपले निवेदन सादर केले. तेलंगण निर्मिती झाल्यास सीमांध्रा भागात प्रचंड हिंसाचार माजेल, त्याची जबाबदारी कोण घेईल, असा सवाल त्यांनी आपल्या या निवेदनात केला आहे.