पाटणा, बोधगया स्फोटातील दहशतवाद्यांवर बक्षीसे जाहीर

पाटणा – पाटणा आणि बोधगया येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील पाच संशयित दहशतवाद्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली असून त्यांची माहिती देणार्यां ना पाच व दहा लाख रूपयांची बक्षीसे पोलिसांनी जाहीर केली आहेत. पाटणा स्फोट प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच चार संशयितांना अटक केली आहे.

ज्या पाच दहशतवाद्यांची छायाचित्रे व त्यांच्यावर लावलेली इनामे जाहीर करण्यात आली आहेत त्यातील १ बिहारचा असून बाकीचे चार झारखंड राज्यातील आहेत. पोलिस अधिकार्यांीनी दिलेल्या माहितीनुसार समस्तीपूर येथील तहसीन अख्तर उर्फ मोनू हा बोधगयेतील स्फोटांमागचा मास्टरमाईंड असून त्याच्यावर १० लाखांचे इनाम जाहीर केले गेले आहे. त्याचा सहकारी रांचीचा हैदर अली ऊर्फ अब्दुल्ला याच्यावरही १० लाखांचे इनाम असून या दोघांचा पाटणा, बोधगया तसेच वाराणसी, मुंबई हैद्राबाद येथील स्फोटातही हात होता.

नूमन अन्सारी, तौकीक अंसारी व मुजिबुल्ला हे अन्य तिघे रांचीचेच असून त्यांच्यावर पाच लाख रूपयांचे इनाम जाहीर केले गेले आहे. हे सर्वजण इंडियन मुजाहिद्नीनशी संबंधित आहेत.