नीरा राडिया टेप प्रकरणी केंद्राला नोटीस

नवी दिल्ली – नीरा राडिया टेप प्रकरणातून उद्योगजगतातील जे बेकायदा व्यवहार समोर आले आहेत त्यावर कारवाई करण्याचे सरकारला आदेश द्यावे या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि सीबीआयला प्रतिज्ञापत्राव्दारे उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायमूर्ती जी.एस.सिंघवी आणि न्यायमूर्ती व्ही.गोपाला गौडा यांनी टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनाही आठवडयाभरात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. नीरा राडिया टेपमधील संभाषण सार्वजनिक करु नये, यासाठी रतन टाटांनी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी दोन डिसेंबर रोजी होणार आहे.

ओपन नियकालिकाच्या वतीने न्यायालयात हजर असणारे वरिष्ठ वकिल राजीव धवन यांनी सुनावणी पुढे ढकलण्यावर आक्षेप घेतला. टाटांच्या याचिकेविरोधात न्यायालयाने आजच सुनावणी घ्यावी अशी विनंती धवन यांनी केली मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली.