मोदी भान राखा – भाजप

नवी दिल्ली – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जर विरोधकांच्या टिकेपासून दूर रहायचे असेल तर त्यांनी भान सांभाळून बोलावे, असा सल्ला पक्षाकडूनच मोदींना देण्यात आला आहे.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांत जाहीर भाषणे करताना केलेल्या चुकांची ही जंत्री. सर्व विरोधकांना पुरून उरलेल्या मोदींकडून बोलण्याच्या ओघात होणा-या या चुकांमुळे त्यांची प्रतिमा खराब होण्याची चिंता भाजपला सतावते आहे त्यामुळे मोदींनी बोलताना भान राखावे, अशी अपेक्षा भाजपने व्यक्त केली आहे.

पाटणा आणि गुजरात येथील जाहीर सभांमध्ये मोदी यांनी इतिहासाचे दाखले देताना अनेक संदर्भ चुकवले होते. मोदींच्या या सभा आणि भाषणे अत्यंत परिणामकारक होऊनही त्यांच्या चुकांमुळे विरोधकांच्या हातात आयते कोलित मिळाले. अनावधानाने झालेल्या या चुकांचा बाऊ करून विरोधक मोदींची फेकू मोदी ही प्रतिमा लोकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न करीत आहेत यामुळे भाजपमधील मॅनेजर्स सावध झाले आहेत.असे भाजपने म्हटले आहे.

मोदींनी लगेचच आपल्या चुका दुरूस्त करून माफी मागितल्यामुळे त्यांच्या प्रतिमेला सध्या तरी फार मोठा धक्का लागलेला नाही. मात्र भविष्यात त्यांनी जीभ आवरली नाही तर लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे भाजपला वाटते आहे.