
अहमदाबाद – नरोदा पाटीया जातीय दंगल प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारी गुजरातची माजी मंत्री माया कोडनानी हिला गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी तीन महिन्यांसाठी सर्शत जामीन मंजूर केला.

अहमदाबाद – नरोदा पाटीया जातीय दंगल प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारी गुजरातची माजी मंत्री माया कोडनानी हिला गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी तीन महिन्यांसाठी सर्शत जामीन मंजूर केला.
वैद्यकीय उपचारासाठी न्यायालयाने कोडनानीला जामीन मंजूर केला आहे. तुरुंगात शिक्षा भोगणा-या कोडनानीला ह्दयविकार आणि आतडयांचा क्षयरोग झाला आहे. कोडनानीने दाखल केलेल्या अर्जात सहा महिन्यांसाठी जामीन मागितला होता मात्र न्यायालयाने तिला तीन महिन्यांचा जामिन मंजूर केला. गुजरात दंगलींचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने कोडनानीच्या जामीनाला विरोध केला.
नियमानुसार तुरुंगात उपचार उपलब्ध करुन देता येऊ शकतात असे एसआयटीने न्यायालयाला सांगितले. मात्र न्यायालयाने कोडनानीच्या वकिलांनी दाखल केलेली कागदपत्रे आणि दोन्हीबाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर तीन महिन्यांसाठी सर्शत जामीन मंजूर केला. 2002 मध्ये गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीत नरोदा पाटीयामध्ये 97 निरपराध नागरिकांची हत्या करण्यात आली होती.
या दंगलीला माया कोडनानीने चिथावणी दिली होती. गेल्यावर्षी एसआयटीच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणी कोडनानीला 26 वर्ष जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नरेंद्र मोदी सरकारमध्ये माजी मंत्री राहिलेल्या कोडनानी सध्या आमदार आहेत. गोध्रा दंगली प्रकरणी दोषी ठरलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. न्यायालयाने कोडनानीला उपचारासाठी कुठे प्रवास करणार आहे त्याची सर्व माहिती एसआयटीला देण्यास सांगितले आहे.