सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवरच विनयभंगाचा आरोप?

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायमूर्तींनी विनयभंग केल्याचा आरोप एका वकील तरुणीने लावला आहे. वकिलीच्या अभ्यासक्रमामध्ये अनिवार्य असलेले प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या काळात त्या न्यायमूर्तींनी विनयभंग केल्याचा आरोप या तरुणीने आपल्या ब्लॉगमधून केला आहे. जर्नल ऑफ इंडियन लॉ अँड सोसायटीच्या ब्लॉगमध्ये या वकील तरुणीने हा विषण्ण करणारा अनुभव मांडला आहे.

6 नोव्हेंबर 2013 रोजी तिने जर्नल ऑफ इंडियन लॉ अँड सोसायटीच्या ब्लॉगमध्ये हा पोस्ट केला आहे. ही वकील तरुणी कोलकात्याच्या नॅशनल युनिवर्सिटी ऑफ ज्युरीडिकल सायसेन्सची विद्यार्थीनी आहे. वकीलीची सनद घेतल्यानंतर सध्या ती एका स्वंयसेवी संस्थेसोबत काम करत आहे.

दिल्लीतील एका हॉटेलमधील रूममध्ये आता निवृत्त झालेल्या आणि एका प्रख्यात तसेच प्रसिद्ध न्यायमूर्तींनी तिचा विनयभंग केल्याचा तिचा आरोप आहे. या आरोपामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. न्यायमंडळातील भ्रष्टाचाराबाबत यापूर्वीही अनेकदा आरोप झाले आहेत. मात्र न्यायालयांचा अवमान होईल, म्हणून त्याविषयी कुणी उघडपणे बोलत नाही.

आताही त्या वकील तरुणीने न्यायमूर्तींचा प्रभाव आणि त्यांची प्रसिद्धी यामुळे इतके दिवस या प्रकरणाविषयी जाहीर वाच्यता केली नसल्याचे आपल्या ब्लॉगमधून स्पष्ट केले आहे. या तरुणीने आपल्या ब्लॉगमधून त्या न्यायमूर्तींचे नाव जाहीर केलेले नाही.

एवढंच नाही तर त्या न्यायमूर्तींविरूद्ध कसलीही कारवाई करायची नाही, असेही त्या तरुणीने आपल्या ब्लॉगमधून स्पष्ट केले आहे. आपल्या कारवाईने त्या न्यायमूर्तींनी आयुष्यभर कमावलेल्या कीर्तीवर तसेच त्यांच्या प्रतिष्ठेंवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करायचे नाही, असेही या तरुणीने आपल्या ब्लॉगमधून स्पष्ट केले आहे.

Leave a Comment