हैयान’ झाले हैवान,10 हजार लोकांचा बळी

टॅक्लोबन/मनीला- फिलिपिन्समध्ये शुक्रवारी झालेल्या हैयान’ या चक्रीवादळाने आतापर्यंत सुमारे दहा हजार लोकांचा बळी घेतल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या वादळात सहा लाख लोक विस्थापित झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने रविवारी दिली. फिलीपाईन्समध्ये धडकलेलं आत्तापर्यंतंचे सर्वात शक्तीशाली वादळ म्हणून ओळखल्या जाणा-या हैयाने या चक्रीवादळाच्या तडाख्यात सुमारे 10 हजार जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे.

या वादळात आत्तापर्यंत सुमारे साडे तीन लाख लोकांना सुरक्षितस्थळी न्यावे लागले आहे. शुक्रवारी फिलीपाईन्समध्ये धडकलेल्या चक्रीवादळामुळे सुरुवातीला 235 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहिले असुन नंतर वादळाची तीव्रता वाढू लागली आहे . चक्रीवादळाच्या तांडवामुळे वादळ्याच्या पट्ट्यात येणारी घर, दळणवळण यंत्रणा संपुर्णपणे उद्धवस्त झाले होते. या वादळाचा 40 लाख लोकांना फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. चक्रीवादळ येण्यापूर्वी सरकारने हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं होतं, पण हे प्रयत्न अपुरे पडल्याचे दिसून येत आहे.

शक्तिशाली हैयान’ या चक्रीवादळाने पूर्व व मध्य फिलिपिन्सला शुक्रवारी मोठा तडाखा दिला. या वादळाचा सहा बेटांना तडाखा बसला. यात लेयटे बेटावरील टॅक्लोबान शहरात दहा हजारांहून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. या बेटाची लोकसंख्या दोन लाख 20 हजार असून, हे बेट मनिलापासून 580 किलोमीटर अंतरावर आहे. या बेटावरील विमानतळ वादळात उद्ध्वस्त झाले आहे. वादळामुळे परिसरातील वीज बंद असून दळणवळण यंत्रणा बंद पडल्या आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता लष्कराच्या अधिका-यांनी व्यक्त केली.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे. फिलिपिन्सला सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे अमेरिकेतर्फे सांगण्यात आले.